
जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
जळगाव,– वर्षानुवर्षे विविध कारणांनी प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक अडचण, वेळेचा अपव्यय या सर्व बाबी टाळण्यासाठी व आप-आपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटवून घेण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात 13 सप्टेंबर, 2025 या एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यात 13 सप्टेंबर, 2025 रोजी एकाच वेळी एकाच दिवशी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदातीचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव येथील राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात करण्यात आले असून लोकअदालत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.क्यु.एस. एम. शेख हे राहणार आहेत. लोकअदालतीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा वकील संघ, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे आयुक्त आदि मान्यवरांचे सहाकार्य लाभणार आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार वाहन ट्रॉफीक चलान, भुसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले व खटले दाखलपुर्व प्रकरणे तसेच ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते असे संपूर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यात येतील. त्याचप्रमाणे राष्ट्रीयकृत बँका, कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या, दुरध्वनी कार्यालय यांनी थकीत रकमेमध्ये सुट देण्याबाबत प्रस्तावित केलेले आहेत. आद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंचाकडील तडजोडयोग्य प्रकरणेदेखील त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतींमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत.
तरी ज्या पक्षकारांना वेळ, पैसा यांचा अपव्यय टाळायचा आहे अशा सर्व पक्षकारांनी आपली प्रकरणे सामोपचार व तडजोडीने निकाली काढण्यासाठी पक्षकार व विधीज्ञ यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून नागरिक हितार्थ आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन सचिव, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम