
जिल्ह्यातील १७५ विशेष शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती होणार
जिल्ह्यातील १७५ विशेष शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती होणार
जळगाव: जळगाव जिल्ह्यात गेल्या १५ ते २० वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या १७५ विशेष शिक्षकांना आता कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या या शिक्षकांचे समायोजन केले जात आहे. गुरुवार किंवा शुक्रवारी समुपदेशनाने त्यांना केंद्र शाळांमध्ये पदस्थापना दिली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.
जिल्ह्यातील एकूण १६८ केंद्र शाळांमध्ये १७५ विशेष शिक्षकांना नियुक्ती दिली जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत ७ शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. समायोजनासाठी शिक्षकांकडून विकल्प भरून घेण्यात येणार आहेत. यामध्ये महिला, दिव्यांग आणि सेवाज्येष्ठतेनुसार बदल्या केल्या जातील. कार्यरत असलेले केंद्रच विकल्प म्हणून भरण्याची मुभा शिक्षकांना देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विशेष शिक्षकांचा प्रश्न सुटला असला तरी, अतिरिक्त ठरणाऱ्या ७ शिक्षकांच्या नियुक्तीबाबतचा प्रश्न अद्यापही कायम आहे. या शिक्षकांना कोणत्या नियमांनुसार नियुक्ती दिली जाईल, याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अनेक वर्षे आंदोलने आणि उपोषण करूनही न सुटलेला हा प्रश्न न्यायालयाच्या निर्णयाने सुटल्याने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम