
जिल्ह्यात सहा नगरपरिषदांतील १२ जागांच्या निवडणूक प्रक्रिया ढकलल्या
जिल्ह्यात सहा नगरपरिषदांतील १२ जागांच्या निवडणूक प्रक्रिया ढकलल्या
२० डिसेंबरला मतदान, २१ डिसेंबरला मतमोजणी
जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या रणधुमाळीत मोठा बदल घडवत राज्य निवडणूक आयोगाने नवीन आदेश जारी केला असून सहा नगरपरिषदांमधील एकूण १२ प्रभागांची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा आणि भुसावळ या नगरपरिषदांच्या काही प्रभागांचा यात समावेश आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या आदेशानुसार पुढे ढकललेल्या प्रभागांमध्ये
* अमळनेर : प्रभाग १ अ
* सावदा : प्रभाग २ ब, ४ ब, १० ब
* यावल : प्रभाग ८ ब
* वरणगाव : प्रभाग १० अ, १० क
* पाचोरा : प्रभाग ११ अ, १२ ब
* भुसावळ : प्रभाग ४, ५ आणि ११
या सर्व प्रभागांमध्ये आता २० डिसेंबर रोजी मतदान, तसेच २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान इतर सर्व प्रभागांमध्ये २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे.
निवडणूक पुढे ढकलण्यामागे तांत्रिक कारणांचा संदर्भ देण्यात आला असून काही उमेदवारांनी नामनिर्देशन प्रक्रियेत दाखल केलेल्या हरकती न्यायालयात गेल्याने २२ नोव्हेंबरपर्यंत निकाल येणे अपेक्षित होते; मात्र निकाल २५ नोव्हेंबरनंतर लागल्याने माघारीसाठी व चिन्हवाटपासाठी उमेदवारांना अपेक्षित वेळ मिळाला नाही. परिणामी या १२ प्रभागांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मात्र या प्रभागांसाठी नवीन नामनिर्देशन दाखल करता येणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम