जिल्ह्यात १९ गावांना दूषित पाण्याचा पुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

बातमी शेअर करा...

जिल्ह्यात १९ गावांना दूषित पाण्याचा पुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जळगाव | प्रतिनिधी

जिल्ह्यातील अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे पाणीटंचाईचे संकट गडद झाले असताना, दुसरीकडे आता १९ गावांमध्ये दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने एप्रिल महिन्यात घेतलेल्या जलनमुना तपासणीत ही माहिती निष्पन्न झाली असून, संबंधित ग्रामपंचायतींना ‘यलो कार्ड’ देण्यात आले आहे. या गावांमध्ये पाण्यात हानिकारक जीवाणूंचा समावेश आढळल्यामुळे अतिसार व इतर जलजन्य आजारांची लागण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दूषित पाणीपुरवठ्याची कारणे

जलस्त्रोतांपासून गावांतील पाण्याच्या टाकीपर्यंतचा मार्ग अस्वच्छ असल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गळती, नादुरुस्त व्हॉल्व्ह आणि साठवण टाक्यांची सफाई न झाल्यामुळे पाण्यातील गुणवत्तेत घट झाली आहे.

प्रशासनाची तातडीची कारवाई

आरोग्य विभागाने संबंधित ग्रामपंचायतींना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असून, पाण्यात टीसीएल पावडर मिसळणे, पाईपलाईन आणि टाक्यांची स्वच्छता करणे, तसेच गळती दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दूषित पाणीपुरवठा होणारी गावे

अमळनेर: ओझर, टाकळी प्र.चा

भडगाव: गिरड, वडगाव बु., पिंपरखेड, धात्रे, पडासखेडे

भुसावळ: मोंढाळे, कंडारी

बोदवड: कुऱ्हा हरदो

चाळीसगाव: बिलखेड

एरंडोल: जानफळ, मालखेड तांडा, कासोदा

जामनेर: रांजणी, अंबिलहोळ

पारोळा: शेळावे

यावल: म्हैसवाडी, कासवा

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम