
जुगारात गमावले पैसे अन् दागिने; पोलिसांत खोटी तक्रार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न
जुगारात गमावले पैसे अन् दागिने; पोलिसांत खोटी तक्रार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न
भुसावळ (प्रतिनिधी) – जुगाराच्या अधाशी सवयीमुळे घरातील रोख रक्कम आणि दागिने गमावलेल्या एका महिलेने घरफोडीचा बनाव रचून पोलिसांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या चाणाक्ष पथकाने सखोल तपास करत हा बनाव उघडकीस आणला. संबंधित महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोटा गुन्हा दाखल करून ‘बचाव’ करण्याचा प्रयत्न
१० जून रोजी भुसावळातील नॉर्थ कॉलनी परिसरात दुपारी घरफोडी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदार महिलेने अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने चोरल्याचा दावा केला. मात्र, घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना घराचे कुलूप सुस्थितीत आढळून आले आणि शेजारील घरही १० दिवसांपासून बंद होते. या विरोधाभासामुळे पोलिसांना संशय आला.
सखोल चौकशीत तक्रारदार शर्मिला चंद्रमणी शिंदे (वय ४९, रा. नॉर्थ कॉलनी, भुसावळ) यांना जुगाराचे व्यसन असल्याचे उघडकीस आले. त्यांनी केवळ घरातील बचतच नव्हे, तर सावकाराकडून घेतलेले कर्जही जुगारात गमावले. इतकंच नव्हे तर, स्वतःचे आणि मुलाचे सोन्याचे दागिने बुलढाणा अर्बन को-ऑप. बँकेत तारण ठेवून घेतलेले गोल्ड लोनदेखील जुगारात खर्च झाले.
तांत्रिक तपासाने उघडला बनाव
पोलिसांनी बँकेकडून दागिन्यांच्या तारणाची अधिकृत पावती मिळवून पुरावा जमा केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कथित घरफोडी पूर्णपणे बनावट असल्याचे सिद्ध झाले. अखेर शर्मिला शिंदे यांना संशयित आरोपी म्हणून निष्पन्न करण्यात आले.
एलसीबी पथकाची भक्कम कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, संदीप चव्हाण व चा.पो.कॉ. महेश सोमवंशी यांनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम