
जुन्या वादातून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या ; दोन जण जखमी
जुन्या वादातून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या ; दोन जण जखमी
जळगाव शहरातील घटना ; दोन जणांना अटक
जळगाव: शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना, आणखी एका धक्कादायक घटनेने जळगाव हादरले आहे. लाईट गेल्याची तक्रार देण्यासाठी जात असलेल्या एका तरुणाचा पाठलाग करून भरदिवसा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. हा हल्ला १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन वाजता दिक्षितवाडीतील मटन मार्केटजवळ घडला. या हल्ल्यात तरुणाच्या चुलत भावासह मित्रही गंभीर जखमी झाले आहेत.
मृत विशाल रमेश बंसवाल (मोची) (वय २६, रा. रामेश्वर कॉलनी) हा वेल्डिंगचे दुकान चालवत होता. रविवारी रात्री तो आपल्या काकांकडे तुकारामवाडी येथे थांबला होता. रात्री दोनच्या सुमारास अचानक वीज गेल्याने तो त्याचा चुलत भाऊ आकाश मोची आणि मित्र रोहित भालेराव यांच्यासोबत दुचाकीवरून एमएसईबीच्या कार्यालयाकडे निघाला.
दिक्षितवाडीतील जिमसमोरून जात असताना, तेथे वाढदिवस साजरा करणाऱ्या एका टोळक्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. भूषण अहिरे, पवन उर्फ बद्या बाविस्कर, आकाश उर्फ खंड्या सुखलाल ठाकूर आणि त्यांच्या साथीदारांनी विशालला गाडीवरून खाली ओढले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली.
‘आमच्यावर एमपीडीए लावता का?’ म्हणत केला हल्ला
हल्लेखोर “आम्ही भूषण भाचाचे साथीदार आहोत, आमच्यावर एमपीडीए लावता का, मारूनच टाकतो” असे ओरडत होते. त्यांनी विशालच्या मानेवर, छातीवर आणि डोक्यावर अनेक वार केले. हल्ल्यातून वाचण्यासाठी विशाल पळत सुटला, परंतु रस्त्यावरच दुभाजकाजवळ कोसळला. हल्लेखोरांनी त्याच्यासोबत असलेल्या आकाश आणि रोहित यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूने जखमी केले आणि पळ काढला.
जुन्या वैमनस्यातून हत्या?
या घटनेनंतर विशालला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिसांनी पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर, आकाश उर्फ खंड्या सुखलाल ठाकूर, भूषण मनोज अहिरे आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला.
सूत्रांनुसार, हल्लेखोरांचा विशालच्या मित्रांसोबत २०१२ मध्ये वाद झाला होता. तसेच, सूरज ओतारी याच्या खुनाच्या प्रकरणातही हेच टोळके सहभागी होते. सूरज ओतारी आणि विशालचे मित्र संबंधित असल्याने, जुन्या वैमनस्यातूनच हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दोन आरोपींना अटक
जिल्हापेठ पोलिसांनी तातडीने तपास पथके तयार केली. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ कारवाई करत संशयित आकाश सुकलाल ठाकूर उर्फ खंड्या आणि भूषण रमेश अहिरे यांना अटक केली आहे. इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम