
जुन्या वादातून दोन वृद्ध भावांना मारहाण; एकाचा हात फ्रॅक्चर
जुन्या वादातून दोन वृद्ध भावांना मारहाण; एकाचा हात फ्रॅक्चर
धरणगाव – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघा वृद्ध भावांना बेदम मारहाण करत एका भावाचा हात फ्रॅक्चर केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे ९ जून रोजी सकाळी ८ वाजता घडली. तब्बल काही दिवसांनी अखेर शुक्रवारी १८ जुलै रोजी या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोनगाव येथील रहिवासी डिगंबर नारायण पाटील (वय ७८) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ९ जून रोजी सकाळी ८ वाजता डिगंबर पाटील आणि त्यांचे भाऊ झिंगा पाटील यांच्यावर गावातीलच शांताराम आत्माराम पाटील याने जुन्या वादातून शिवीगाळ करत दोघांनाही बेदम मारहाण केली.
या मारहाणीत डिगंबर पाटील यांचा हात पिरगळून फ्रॅक्चर करण्यात आला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मारहाण करताना “तुम्ही गावात कसे राहता?” अशा प्रकारची धमकीही आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
शुक्रवारी १८ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता झिंगा पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शांताराम आत्माराम पाटील (रा. दोनगाव, ता. धरणगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ संदीप खंडारे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम