
जैन इरिगेशन उभारणार देशातील अग्रसेर बायोचार प्रकल्प
जैन इरिगेशन उभारणार देशातील अग्रसेर बायोचार प्रकल्प
शेतातील अवशेषांपासून बायोचार, स्वच्छ ऊर्जा आणि अतिरिक्त उत्पन्न; जैन इरिगेशनच्या संवादसत्रात शाश्वत शेतीची दिशा
जळगाव प्रतिनिधी : शेतीत निर्माण होणारे पिकांचे अवशेष हा कचरा नाही तर ते एक उत्पन्नाचे मोठे साधन होऊ शकते. पर्यावरण संवर्धनासोबतच देशासाठी महत्त्वाचे असणारे कार्बन क्रेडीट त्यातून कमाविता येऊ शकतात. शेतातील जैविक कोळसा म्हणजे बायोचार होय. शाश्वत शेतीसह शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळावे, यासाठी कंपनीकडून उभारण्यात येणारा ‘जैन औद्योगिक बायोचार प्रकल्प’ देशात अग्रसेर ठरेल, असा सूर जैन हिल्स येथे झालेल्या बायोचार प्रकल्पाच्या सल्लामसलत संवादसत्रातून शुक्रवारी (ता.२१) निघाला.
जैन हिल्स येथील बडी हंडा सभागृहात झालेल्या या कार्यशाळेप्रसंगी व्यासपीठावर जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, केळी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अरुण भोसले, मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत बाहेती, कापूस संशोधक गिरीष चौधरी, संशोधक गणेश देशमुख, शेतकरी प्रतिनिधी किशोर चौधरी, सुधाकर येवले, लता बारी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने या कार्यशाळेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचक्रोशितील शेतकरी, अभ्यासक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जैन फार्म फ्रेश फूडचे संचालक अथांग जैन यांनी ऑनलाईन संवाद साधला. प्रकल्पामागील भूमिका त्यांनी मांडली. जैन इरिगेशनचा परिचय, उद्दिष्टे, ध्येयदृष्टिकोन, शाश्वत शेतीबाबत बांधिलकी तसेच बायोचार प्रकल्पाविषयी माहिती त्यांनी दिली. ‘सार्थक करुया जन्माचे रुप पालटू वसुंधरेचे’ या श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या विचारांतूनच हा प्रकल्प अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरू शकेल, अशी अपेक्षा अथांग जैन यांनी व्यक्त केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम