
जैन इरिगेशन कंपनीला प्रतिष्ठेचा स्मार्ट बनाना फार्म टेक प्रमोशन पुरस्कार
जैन इरिगेशन कंपनीला प्रतिष्ठेचा स्मार्ट बनाना फार्म टेक प्रमोशन पुरस्कार
जळगाव/ तिरुचिरापल्ली प्रतिनिधी
नवनवीन तंत्रज्ञान कृषीक्षेत्रात विकसीत करून संशोधनाच्या क्षेत्रात दैदीप्यमान काम केलेल्या व शेतक-यांच्या जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. या कंपनीला आज भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रातर्फे अत्यंत प्रतिष्ठित व मानाचा समजला जाणारा ‘स्मार्ट बनाना फार्म टेक प्रमोशन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथे २१ ऑगस्ट १९९३ रोजी राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. आज संस्थेचा ३२ वा स्थापना दिन होता. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्व्हराजन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट बंगलोरचे संचालक तुषार कांती बेहरा यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंपनीच्या वतीने कंपनीच्या केळी विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील आणि टिश्यूकल्चर विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी पुरस्काराचा स्वीकार केला. पुरस्कारात मानपत्र आणि सन्मानचिन्ह यांचा समावेश आहे. पुरस्कार वितरण समारंभाला कोईमतूर येथील ‘इंडियन इन्स्टिटयूट ऑफ शुगरकेन रिसर्च’ संस्थेचे संचालक डॉ. पी. गोविंदराज, नॅशनल रिसर्च इन्स्टिटयूट ऑन इंटीग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचे संचालक डॉ. आर. थंगवेलू आणि तामिळनाडू आदिवासी विभागाचे संचालक श्री. एस. अण्णादुराई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्व्हराजन भाषणात म्हणाले, की अतिशय उत्तम गुणवत्तेची, दर्जेदार व रोगमुक्त रोपे जैन इरिगेशन कंपनीने टिश्युकल्चर तंत्राद्वारे निर्माण करून केळी उत्पादनाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे. कंपनीच्या मूलभूत व पायाभूत संशोधन कार्यामुळे देशाचा केळी निर्यातीच्या क्षेत्रात जगभर नावलौकिक झाला आहे. कंपनीचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांनी खानदेशातील व महाराष्ट्रातील केळींची परदेशात निर्यात व्हावी असे स्वप्न जे पाहिले होते ते जैन कंपनीच्या अथक परिश्रम व कार्यामुळे पूर्णत्वाला जाऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धीची पहाट फुलली आहे. त्यामुळेच निवड समितीने जैन इरिगेशनची पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.
“जैन इरिगेशन कंपनी उत्पादित करीत असलेल्या केळी रोपांसह ठिबक सिंचन, पीव्हीसी व एचडीपीई पाईप आणि अन्य सर्व साहित्यावर अतोनात विश्वास व श्रद्धा ठेवून मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांचा हा सन्मान असून त्यांना आम्ही हा पुरस्कार आदरपूर्वक समर्पित करतो,” असे डॉ. के.बी. पाटील आणि डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम