ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्काराने चिंतामण पाटील तर युवा रंगकर्मी पुरस्काराने विशाल जाधव यांचा गौरव

बातमी शेअर करा...

ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्काराने चिंतामण पाटील तर युवा रंगकर्मी पुरस्काराने विशाल जाधव यांचा गौरव
जळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे दिला जाणारा रंगकर्मी पुरस्कार यंदा ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांना तर युवा रंगकर्मी पुरस्कार विशाल जाधव यांना प्रदान करण्यात आला. रंगभूमीची मध्यवर्ती संघटना म्हटल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ११८ हून अधिक काळापासून रंगभूमीची सेवा करणारी नाट्यकर्मींची एकमेव संघटना आहे. याच संघटनेची जळगाव जिल्हा शाखा २०१९ पासून अस्तित्वात आली. गेल्या दोन वर्षांपासून जळगाव जिल्हा शाखेतर्फे रंगकर्मी पुरस्काराने स्थानिक कलावंतांचा गौरव करण्यात येतो.
हे रंगकर्मी पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष अॅड.संजय राणे यांच्या हस्ते दोन्ही रंगकर्मींना प्रदान करण्यात आले. मानपत्र, रोख रुपये पाच हजार व शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी रंगमंचावर सहकार्यवाह योगेश शुक्ल, नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे, समन्वयक पवन खंबायत, ज्येष्ठ रंगकर्मी पियुष रावळ, ॲड.नितीन देशमुख, पियुष नाशिककर, उमेश घळसासी आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कलावंत चिंतामण पाटील हे गेल्या पाच दशकांपासून जळगावच्या रंगभूमीवर कार्यरत असून, त्यांनी महाविद्यालयीन काळापासून जळगावची रंगभूमी गाजवली आहे. त्यांनी २६ जानेवारी १९७९ रोजी स्थापन केलेल्या खान्देश नाट्य प्रतिष्ठान या संस्थेला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. आजवर सादर केलेल्या सरहद्द, सापळा, मध्यरात्रीचा सूर्य, हुंडेकरी, रंग उमलत्या मनाचे, दीपस्तंभ, माणूस एके माणूस, आनंदमयी, सावल्या यासह अनेक पुरस्कारप्राप्त एकांकिका व नाटकांचे सादरीकरण जळगावचे नाव राज्यभरात पोहचविलेले आहे.

तसेच युवा रंगकर्मी पुरस्कारप्राप्त रंगकर्मी विशाल जाधव यांनी आपली अभिनय कारकिर्द शाहीर विनोद ढगे यांच्या पथनाट्य पथकापासून सुरु करुन नंतर विविध संस्थांच्या एकांकिका व नाटकातून अभिनय करत अनेक पुरस्कार प्राप्त केले. त्यानंतर स्वतःची समर्थ बहुउद्देशीय संस्था स्थापन करुन राज्य नाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धा, महावितरण नाट्य स्पर्धा अशा अनेक स्पर्धांतून यश संपादन केले आहे.

‘नाट्य परिषद करंडक’ प्राथमिक फेरी संपन्न
रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित… शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला ‘नाट्यकलेचा जागर’ दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. यावर्षी जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी दि. २३ रोजी नूतन मराठा महाविद्यालयाच्या नाट्य सभागृहात राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सव म्हणजेच ‘नाट्य परिषद करंडक’ आयोजित करण्यात आला होता.
जळगाव जिल्ह्यातून ९ एकांकिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. दि. २३ ऑगस्टला सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. उद्‌घाटन झाल्यानंतर रंगशाळा जळगाव निर्मित – सख्खे शेजारी, दीपरंग भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगरची – मानस, नाट्यरंग जळगाव यांची – गाईड, नूतन मराठा महाविद्यालय नाट्यशास्त्र व सांस्कृतिक विभाग जळगाव यांची- सुबन्या आणि…, समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे बुद्रूक, ता.एरंडोल यांची – काजव्यांचे स्वप्न, समर्थ कला बहुउद्देशीय संस्था जळगाव यांची- सांबरी, आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव यांची – दिशा, भाग्यदीप थिएटर्स जळगाव यांची- ओजस्वी या एकांकिका सादर करण्यात आल्या.

ही स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी अश्या दोन फेऱ्यांमध्ये होणार असून, या प्राथमिक फेरीतून पारितोषिकप्राप्त एका एकांकिकेची निवड अंतिम फेरीसाठी होणार आहे. अंतिम फेरी मुंबई येथे १५ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा – माहीम, मुंबई येथे होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य परिषदेकडून नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा यशस्वीतेसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य व शहरातील कलावंतांनी परीश्रम घेतलेत

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम