
ज्वारी–मका खरेदी नोंदणीस शासनाची मुदतवाढ
ज्वारी–मका खरेदी नोंदणीस शासनाची मुदतवाढ
१५ डिसेंबरपर्यंत शेतकरी नोंदणी करा, जिल्हा प्रशासनाचे आवाहन
जळगाव :– खरीप पणन हंगाम २०२५–२६ अंतर्गत किमान आधारभूत किमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, मका व बाजरी (भरडधान्य) खरेदीकरिता शेतकरी नोंदणीच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत होती मात्र आता असलेली नोंदणी BeAM पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असून नोंदणी संथ गतीने होत असल्याने शासनाने नोंदणीची मुदत दि. १५ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाने प्रत्यक्षात खरीप खरेदी प्रक्रिया ३ नोव्हेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्याचे निश्चित केले असून, भरडधान्याकरिता ज्वारी (संकरीत) – ₹३६९९, मका – ₹२४००, बाजरी – ₹२७७५ रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगांव, पाळधी, एरंडोल, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव, चाळिसगाव इ. केंद्रांवर शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ घेता येणार आहे.
तरी सर्व शेतकरी बांधवांनी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. ही योजना शेतक-यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरीता राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतक-यांनी ज्वारी, मका व बाजरी विक्रीकरीता आपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर जावून ७/१२ उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेवून प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करुन घ्यावी. नोंदणी ही ऑनलाईन पध्दतीने PoS मशिनद्वारे करण्यात येणार असल्यामुळे शेतक-यांनी आधारकार्ड, बैंक पासबुक, चालू वर्षाचा ७/१२ उतारा, पीकपेरा इ. कागदपत्रांसह नोंदणीकरीता प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
तसेच खरेदीकरीता आपणास SMS प्राप्त झाल्यानंतर शेतक-यांनी आपला F.A.Q. दर्जाचे भरडधान्य विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेवून यावा व जास्तीत जास्त शेतक-यांनी सदरील योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे, जळगांव, जिल्हा उपनिबंधक जळगांव, जिल्हा कृषी अधिक्षक जळगांव व जिल्हा पणन अधिकारी, जळगांव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम