
झाडावरून पडून तरुणाचा मृत्यू
म्हसावद शिवारातील हृदयद्रावक घटना
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील म्हसावद शिवारात झाडाच्या फांद्या तोडत असताना तोल जाऊन पडल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (४ एप्रिल) दुपारी १२.३० वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नान्या काका पावरा (वय ३०, रा. दहिवद, ता. शिरपूर, सध्या रा. म्हसावद, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मजुरी आणि शेती करून आपला उदरनिर्वाह करत होता.
घटनेच्या दिवशी नान्या पावरा शेतात झाडाच्या फांद्या तोडत असताना अचानक तोल जाऊन जमिनीवर कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि अंगावर गंभीर दुखापत झाली. त्याचे मित्र सुरज पावरा यांनी तातडीने त्याला खाजगी वाहनाद्वारे जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
शनिवारी (५ एप्रिल) सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर आणि पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र मोरे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम