टेकवाडे शिवारात बिबट्याचा हल्ला; १२ मेंढ्यांचा फडशा, परिसरात भीतीचे वातावरण

बातमी शेअर करा...

टेकवाडे शिवारात बिबट्याचा हल्ला; १२ मेंढ्यांचा फडशा, परिसरात भीतीचे वातावरण

चाळीसगाव : गिरणा पट्ट्यातील पशुधनावर हिंस्त्र प्राण्यांचे हल्ले सुरूच आहेत. शनिवारी पहाटे टेकवाडे शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तब्बल १२ मेंढ्यांचा मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टेकवाडे रस्त्यावरील राजाराम श्रीराम भील यांच्या धनगरवस्तीजवळ मेंढ्या जाळीत बांधलेल्या होत्या. पहाटेच्या सुमारास बिबट्याने जाळीखाली माती कोरून आत प्रवेश केला व मेंढ्यांवर झडप घातली. यात १२ मेंढ्या ठार झाल्या असून काहींची पोटफाड तर काहींच्या नरडीचे लचके तोडले. गावकऱ्यांच्या मते हा हल्ला बिबट्याने केल्याचे स्पष्ट होत आहे.

याआधी काही दिवसांपूर्वी बहाळ शिवारात बिबट्याने एका कुत्र्याचा फडशा पाडला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे सावट अधिकच गडद झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनपाल सी. व्ही. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व भील कुटुंबीयांना धीर देत लवकरच शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र या घटनेनंतर टेकवाडे व आसपासच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बहाळ परिसरात बिबट्या गेल्या अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसल्याची चर्चा असून स्थानिक पातळीवर त्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम