ट्रक रेल्वे गेट तोडून थेट अमरावती एक्सप्रेसला धडकला

बोदवड येथील घटनेने खळबळ

बातमी शेअर करा...

ट्रक रेल्वे गेट तोडून थेट अमरावती एक्सप्रेसला धडकला

बोदवड येथील घटनेने खळबळ

बोदवड प्रतिनिधी

गव्हाने भरलेला तामिळनाडूचा ट्रक (टीएन 52-एफ-7472) मुक्ताईनगरवरून बोदवडकडे जात असताना रेल्वे गेट तोडून थेट अमरावती एक्सप्रेसला धडकला. या भीषण अपघातामुळे रेल्वे वाहतूक तब्बल ५ तास ठप्प झाली होती. तीन गाड्यांचे मार्ग बदलले गेले, तर दोन पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या. सुदैवाने, कोणतीही जिवितहानी झाली नाही.

आज (दि. १४) सकाळी ४:४५ वाजता हा अपघात घडला. ट्रक चालकाने रेल्वे ओव्हरब्रिजचा वापर न करता बंद असलेला रेल्वे गेट तोडून ट्रॅकवर प्रवेश केला. त्याच वेळी वेगाने येणाऱ्या अमरावती एक्सप्रेसने ट्रकला जोरदार धडक दिली. धडकनंतर रेल्वेने ट्रकला सुमारे २०० ते ३०० मीटरपर्यंत फरफटत नेले. यामुळे रेल्वे इंजिनचे मोठे नुकसान झाले असून, संपूर्ण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, बोदवड पोलीस आणि रेल्वे आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. ट्रकला इंजिनखाली अडकलेल्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणि क्रेन तात्काळ मागवण्यात आल्या. तसेच, विद्युत पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला.

 

या अपघातामुळे खालील रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल

महाराष्ट्र एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस
भुसावळ-बडनेरा आणि बडनेरा-नारखेडा पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या.
काही गाड्या वरणगाव आणि भुसावळ येथे थांबवण्यात आल्या.

बोदवड पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भोळे यांनी सांगितले की, ट्रक चालकाला रस्त्याची माहिती असणे आवश्यक आहे, कारण ओव्हरब्रिज सुरु होऊन दीड वर्ष झाले आहे. त्यामुळे, त्याने चुकून जुन्या मार्गाचा वापर केला असावा. सध्या गॅस कटरच्या मदतीने ट्रक कापण्याचे काम सुरू असून, जेसीबीच्या सहाय्याने ट्रक हटवला जात आहे.

रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त इंजिन दुरुस्तीसाठी पियूषनगर येथे पाठवले जाईल, आणि अमरावती एक्सप्रेसला नवीन इंजिन जोडून मार्गस्थ करण्यात येईल. सकाळी ९:३० ते १०:०० पर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही, हे सुदैवाने सांगता येईल. तथापि, या घटनेने रेल्वे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. प्रवाशांकडून संबंधित ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम