
ट्रॅक्टरचे साहित्य चोरणाऱ्या चिंचगव्हाणच्या दोघांना अटक
ट्रॅक्टरचे साहित्य चोरणाऱ्या चिंचगव्हाणच्या दोघांना अटक
चाळीसगाव : तालुक्यातील चिंचगव्हाण येथील ट्रॅक्टर-ट्रॉली जोडण्याचे डाबर व पिना तसेच रोटर, नांगर जोडणारे साहित्य चोरी करणाऱ्या दोघांना मेहूणबारे पोलिसांनी तपास करून शिताफीने अटक केली. चोरी करणारे चिंचगव्हाण येथीलच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
चिंचगव्हाण येथील प्रीतम पुरुषोत्तम बागुल यांनी त्यांचे सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर (एमएच १९, ईए ३२३४) शेडमध्ये लावले होते. अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरचे ट्रॉली जोडण्याचे डाबर व पिना तसेच रोटर, नांगर जोडण्यासाठी आवश्यक असणारे आडवे उभे हात असे ५० हजाराचे स्पेअर पार्ट चोरुन नेले होते. याबाबत बागूल यांनी ८ रोजी मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल केला होता. या प्रकरणी स.पो.नि. प्रवीण दातरे, पो.उ.नि. सुहास आव्हाड, पो.हे.कॉ. मोहन सोनवणे, किशोर पाटील, शांताराम पवार, पो.कॉ. विनोद बेलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला. यात चिंचगव्हाण येथीलच संशयित प्रवीण जालिंधर पाटील (वय २८) व दिलीप श्रीराम निकम (वय २२) या दोघांना अटक केली. या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली. यात त्यांनी गुन्हयाची कबुली देवून चोरी केलेले ५० हजाराचे साहित्य काढून दिले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम