
ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोन भाऊ गंभीर ; खोटेनगरजवळील घटना
ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोन भाऊ गंभीर ; खोटेनगरजवळील घटना
जळगाव प्रतिनिधी
जळगाव : शहराजवळील खोटेनगर परिसरात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात भरधाव ट्रॅव्हल्स बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. यापैकी एका भावाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गणपत भिकन कुंभार (वय ३५) आणि त्यांचा लहान भाऊ अर्जुन कुंभार, दोघेही निमखेडी येथील रहिवासी असून, मंगळवारी रात्री ते दुचाकीने खोटेनगरच्या दिशेने जात होते. दरम्यान, हॉटेल राधिकाजवळ पाळधीकडून जळगावकडे येणाऱ्या एका भरधाव ट्रॅव्हल्स बसने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीचा पूर्णतः चक्काचूर झाला.
धडक इतकी भीषण होती की दोन्ही भाऊ रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी गणपत कुंभार यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर अर्जुन कुंभार यांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर ट्रॅव्हल्सचा चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांनी बसचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम