
ठाकरे बंधू अखेर एकत्र; शिवसेना–मनसे युतीची ऐतिहासिक घोषणा
ठाकरे बंधू अखेर एकत्र; शिवसेना–मनसे युतीची ऐतिहासिक घोषणा
महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र येण्याचा निर्णय
मुंबई | वृत्तसंस्था : महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ चर्चेत असलेली शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अखेर प्रत्यक्षात उतरली असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संयुक्तपणे या राजकीय युतीची अधिकृत घोषणा केली. “महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो क्षण आज आला आहे,” असे स्पष्ट शब्दांत राज ठाकरे यांनी यावेळी सांगत, मराठी माणसाच्या हितासाठी दोन्ही ठाकरे एकत्र आल्याचे जाहीर केले.
या ऐतिहासिक निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले की, कोणतेही मतभेद, वाद किंवा भांडण यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. याच विचारातून एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. “जे काही उरले आहे, ते सर्व जाहीर सभेत मांडू. सध्या निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ लवकरच कळवली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उपरोधिक टीकाही केली. राज्यात लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्यांची चर्चा सुरू असताना, त्यात आणखी दोन टोळ्या वाढल्या असून त्या राजकीय पक्षांतील असल्याचा टोला त्यांनी नाव न घेता लगावला. सत्तेच्या राजकारणात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींवर त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या या घोषणेनंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. मुंबईसह राज्यभरात फटाके, ढोल-ताशे आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला जात असून, अनेक ठिकाणी एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम