
ठाणे जिल्हा परिषदेतर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा सन्मान सोहळा
ठाणे जिल्हा परिषदेतर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा सन्मान सोहळा
ठाणे प्रतिनिधी ;– जिल्हा परिषदेतर्फे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से) यांचा सन्मान सोहळा दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन, ठाणे येथे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (भा.प्र.से) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या प्रसंगी माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या पत्नी डॉ. मिहिका घुगे तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. ठाणे जिल्हा परिषद परिवार, विविध विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, सामाजिक संस्था आणि ग्रामविकास संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचा सन्मान केला.
मनोगत व्यक्त करताना मा. रोहन घुगे म्हणाले,“ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक आठवण ही माझ्यासाठी मोलाची आहे. माझ्या सहकाऱ्यांच्या समन्वयातून आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे अनेक लोकाभिमुख उपक्रम यशस्वीरीत्या राबवता आले. ठाण्यातील सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांनी प्रशासनाला दिलेले सहकार्य अविस्मरणीय आहे. लोकाभिमुख काम करताना ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हेच माझ्या कामाचे खरे समाधान आहे.”
रोहन घुगे पुढे म्हणाले, “जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाने नाविन्यपूर्ण कामकाजासाठी पुढाकार घेतला, त्यामुळेच ठाणे जिल्हा परिषद ‘१०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत राज्यात प्रथम’ आली. हा सर्वांचा संयुक्त यश आहे. ठाण्यातील पत्रकार बांधवांनी वेळोवेळी बातम्यांचा पाठपुरावा करून प्रशासनाचे काम जनतेपर्यंत पोहोचवले. ठाण्यातील आठवणी माझ्या मनात कायम राहतील.”
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “रोहन घुगे यांनी ठाणे जिल्ह्यात कार्यरत असताना पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासनाचे उत्कृष्ट उदाहरण साकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा प्रशासनाने राज्यात लौकिक मिळवला असून, त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा!”
भिवंडी मतदारसंघ बाळ्या मामा म्हात्रे, यांनी सन्मान सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून परिणामकारक प्रशासनाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचा प्रत्येक उपक्रम हा केवळ शासकीय न राहता लोकांच्या सहभागातून साकार झाला. हेच त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे. ठाणे जिल्ह्याला डिजिटल आणि विकासाच्या दिशेने वेग दिला. त्यांच्या कार्याची छाप दीर्घकाळ ठाणेकरांच्या मनात कायम राहील.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की,“मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यकाळात ठाणे जिल्हा परिषदेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, लोकाभिमुख निर्णयप्रक्रिया आणि नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात आल्या. त्यांच्या नेतृत्वामुळे ठाणे जिल्हा परिषद राज्यात नावलौकिकास पात्र ठरली.”
या प्रसंगी शिवसेना अध्यक्ष प्रकाश पाटिल, अपर आयुक्त माणिकराव दिवे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटिल, शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, कार्यकारी अभियंता (बाधंकाम) पद्माकर लहाने, प्रकाश सासे, युवराज कदम, कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर, समाजकल्याण अधिकारी उज्वला सकपाळे, तसेच जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, पत्रकार आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ. तरुलता धनके आणि प्राथमिक शिक्षक रविंद्र तरे यांनी केले.
ग्रामविकास अधिकारी संघटना, शिक्षक संघटना, सामाजिक संस्था व पत्रकार बांधवांनी रोहन घुगे यांच्या ठाण्यातील कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम