
ठेकेदारीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा सततचा दबाव; पती–सासूवर गुन्हा दाखल
जळगाव प्रतिनिधी – अक्सा नगर परिसरात ठेकेदारीच्या व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याचा सतत दबाव टाकत पती आणि सासूने दिलेल्या छळाला कंटाळलेल्या तरुण विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अखेर २८ नोव्हेंबर रोजी दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हमीदाबी जावेद कुरेशी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून त्या अक्सा नगरात वास्तव्यास होत्या. मृत महिलेचा भाऊ शेख हसन शेख हुसेन (रा. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हमीदाबी यांच्या पती जावेद अजिज कुरेशी यांनी ठेकेदारीचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी माहेरहून वारंवार आर्थिक मदत आणण्याची मागणी केली होती. पैसे न आणल्याने तिच्यावर शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास होत असे. या छळास कंटाळून हमीदाबी यांनी १५ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास लावून जीवन संपवले.
घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तीव्र संताप व्यक्त करत आक्रोश केला होता. अंत्यसंस्कारानंतर अखेर कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून पती जावेद अजिज कुरेशी व सासू सकीनाबी अजिज कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम