डंपरच्या धडकेने कार नदीपात्रात कोसळली ; आई मुलाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा...

डंपरच्या धडकेने कार नदीपात्रात कोसळली ; आई मुलाचा जागीच मृत्यू

पितापुत्र गंभीर जखमी ; विदगावच्या नदी पुलावरील घटना

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव-चोपडा मार्गावरील विदगावजवळील तापी नदीच्या पुलावर मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबावर काळाने घाला घातला. भरधाव वाळूच्या डंपरने कारला जोरदार धडक दिल्याने कार थेट नदीपात्रात कोसळली, यात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर वडील आणि दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला.

या दुर्घटनेत मीनाक्षी नीलेश चौधरी (रा. विठ्ठल नगर) आणि त्यांचा मुलगा पार्थ (वय १२) यांचा मृत्यू झाला. नीलेश प्रभाकर चौधरी (वय ३६) आणि त्यांचा दुसरा मुलगा ध्रुव (वय ४) हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भयंकर होता की, अवघ्या काही क्षणांत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले.

चौधरी कुटुंब चोपडा येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते. परतताना विदगावजवळील तापीपुलावर हा अपघात घडला. डंपरची धडक इतकी जोरदार होती की, कारचे नियंत्रण सुटून ती थेट नदीपात्रात कोसळली. अपघातानंतर वाळूने भरलेला डंपर आडवा उभा राहिल्याने तापीपुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

शिक्षक दांपत्यावर काळाची झडप

नीलेश चौधरी हे धानोरा येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर मयत मीनाक्षी चौधरी या शिवाजीनगरमधील शाळेत शिक्षिका होत्या. शिक्षकी पेशातील या दांपत्यावर आलेल्या या अनपेक्षित संकटाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम