डांगर बु।। येथील समस्या सोडविण्यासाठी लवकरच निधी देणार – उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे आश्वासन
जनसन्मान यात्रे दरम्यान सरपंच प्रकाश वाघ यांनी घेतली ना. अजितदादांची भेट
डांगर बु।। येथील समस्या सोडविण्यासाठी लवकरच निधी देणार – उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे आश्वासन
जनसन्मान यात्रे दरम्यान सरपंच प्रकाश वाघ यांनी घेतली ना. अजितदादांची भेट
अमळनेर l प्रतिनिधी
लाडकी बहीण योजना जनसन्मान यात्रेनिमित्ताने दौऱ्यावर असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार हे अमळनेर तालुक्यात सोमवार दि.१२ ऑगस्ट रोजी आले असता,
अमळनेर तालुक्यातील डांगर बु।। येथील सरपंच प्रकाश वाघ यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन डांगर बु।। व परिसरातील गावांच्या समस्या मांडणारे निवेदन त्यांना दिले. निवेदन स्वीकारल्यानंतर ग्रामस्थांशी बोलतांना ना.पवार यांनी या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी लवकरच निधी देवू असे आश्वासन दिले.
मौजे डांगर बुद्रुक (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे पावसाळ्यात तलावात मोठ्या प्रमाणावर साठणाऱ्या पाण्यामुळे गावानजीक असलेली स्मशानभूमी, शेतशिवारासह अल्पसंख्याक वस्ती तसेच रणाईचे, सातरणे या गावांकडे जाण्याकरिता असलेला रणाईचे रस्त्यावरील पूल हा छोटा असल्याने सातत्याने पाण्याखाली जात असतो.
त्यामुळे या दोन गावांचा संपर्क तुटून ग्रामस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. तरी डांगर बुद्रुक ते रणाईचे, सातरणे या रस्त्यावर लवकरात लवकर मोठा पूल बांधणे अत्यावश्यक झाले आहे. सदर पुलाच्या कामाला तात्काळ मंजुरी द्यावी व संबंधितांना त्याबाबत आदेश द्यावे.
तसेच मौजे डांगर बुद्रुक हे गाव ‘डार्क झोन’ मध्ये असल्याने गावात साधारणपणे जुलैपर्यंत टँकरद्वारेच पाणीपुरवठा होत असतो.
या पार्श्वभूमीवर दि. २२ जून २०२३ रोजी पर्यायी जलजीवन मिशन अंतर्गत ई-निविदा क्रमांक ३५० प्रकाशित झालेली आहे. मात्र, त्यावर अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही. तरी कृपया आपल्या माध्यमातून ई-निवेदेप्रमाणे सकारात्मक कार्यवाही होऊन संबंधित कामाला तत्काळ मंजुरीसह निधी द्यावा. आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर सरपंच प्रकाश वाघ, प्रगतीशील शेतकरी राजेश वाघ, उपसरपंच राकेश पाटील, डॉ.जितेंद्र पाटील, सुनिल पाटील, युवराज पाटील, महेश पाटील, राजेंद्र पाटील व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून, या निवेदनाची एक प्रत पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनाही देण्यात आली आहे.
निवेदन वाचल्यानंतर ग्रामस्थांशी जवळपास २० मिनिटे चर्चा करुन ना.पवार यांनी या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी लवकरात लवकर निधी देण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.
ना.पवार यांनी घेतले कानबाईचे दर्शन
खान्देशातील श्रावणाच्या सुरुवातीलाच असणारा मोठा उत्सव म्हणजे कानबाईचा उत्सव असतो. ना.पवार अमळनेर तालुक्यात आले असतांना, डांगर बु।। या गावी ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर, त्यांनी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या ग्रामदेवता मरीआईच्या मंदिराजवळ आलेल्या कानबाईच्या मिरवणुकीत कानबाईचे दर्शन घेवून पूजन केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम