
डांबून ठेवलेल्या धरणगावच्या १५ ऊसतोड मजुरांची सुखरूप सुटका!
अहिल्यानगरमधील प्रकार : जन साहस फाउंडेशनच्या सतर्कतेमुळे प्रशासनाची तत्पर कारवाई
डांबून ठेवलेल्या धरणगावच्या १५ ऊसतोड मजुरांची सुखरूप सुटका!
अहिल्यानगरमधील प्रकार : जन साहस फाउंडेशनच्या सतर्कतेमुळे प्रशासनाची तत्पर कारवाई
जळगाव : ऊसतोडीसाठी काम असल्याचे सांगून अहिल्यानगर येथे नेलेल्या धरणगाव तालुक्यातील १५ मजुरांना वेगळ्याच कामात जुंपून जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आले होते. मजुरीची रक्कम न देता त्यांना उपासमारीच्या स्थितीत ठेवण्यात आले. मात्र, जन साहस फाउंडेशनच्या हस्तक्षेपामुळे आणि प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईमुळे या मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली.
धरणगाव तालुक्यातील हिंगोणे आणि कल्याणे होळ येथील १५ मजुरांना ऊसतोडीच्या कामासाठी श्रीगोंदा तालुक्यात नेण्यात आले होते. मात्र, त्यांना तिथून अन्य ठिकाणी हलवून वीटभट्टी व इतर कामांसाठी जबरदस्तीने कामाला लावण्यात आले. मजुरी मागितल्यास त्यांना धमकावले जाऊ लागले आणि त्यांच्यावर बारीक नजर ठेवत जबरदस्तीने काम करवून घेतले गेले.
जन साहस फाउंडेशनचा पुढाकार
या त्रासाला कंटाळून मजूर देवचंद दोधू भील यांनी जन साहस फाउंडेशनच्या क्षेत्र अधिकारी सोनम केदार यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार मांडला. जिल्हाधिकाऱ्यांनी कामगार उपायुक्त डॉ. रा. डी. गुल्हाने यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले. यानंतर अहिल्यानगर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने कारवाई सुरू केली.
महसूल, कामगार व पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी जन साहस फाउंडेशनच्या समन्वयकांसोबत तातडीने हालचाली केल्या. जिल्हा समन्वयक निलेश शिंदे, राज्य कामगार सुरक्षा समन्वयक सय्यद रुबीना, ॲड. वीरसेन कजाले, पुणे निर्माण टीमचे जिल्हा समन्वयक सिद्धी भाइशेटे, ॲड. सुनील मस्के, तसेच जळगाव जन साहस संस्थेचे क्षेत्र अधिकारी सोनम केदार यांनी मजुरांना शोधून सुरक्षित घरी पोहोचवले.
या कारवाईत हिंगोणे व कल्याणे होळ येथील सुकलाल गायकवाड व त्यांचे कुटुंबीय, प्रदीप भील, मोहन मोरे आणि अन्य मजूर सुखरूप घरी पोहोचले आहेत. या घटनेमुळे मजुरांची फसवणूक करणाऱ्या दलाल आणि ठेकेदारांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या संपूर्ण प्रकरणात जन साहस फाउंडेशनच्या सतर्कतेमुळेच या मजुरांना अन्यायातून मुक्त करता आले. प्रशासनानेही तातडीने कारवाई करत मानव तस्करीसारख्या गंभीर प्रकारास प्रतिबंध घालण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम