
डांभुर्णी शिवारात बिबट्याचा हल्ला; दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
परिसरात भीतीचे वातावरण
यावल ;- यावल प्रादेशिक वनविभागाच्या यावल पश्चिम बनपरिक्षेत्रातील महसुल हद्दीत बिबट्याचा वावर पुन्हा एकदा गंभीर ठरला आहे. डांभुर्णी शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून दोन वर्षीय चिमुकलीचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
सदर घटना १७ एप्रिल रोजी रात्री १२.३० ते १.०० दरम्यान घडली. प्रभाकर चौधरी यांच्या शेतात मागील पाच दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या मेंढपाळ कुटुंबांपैकी रत्ना सतीश ठेलारी (वय २) ही मुलगी आईसोबत झोपलेली असताना बिबट्याने तिच्यावर झडप घालून तिला केळीच्या बागेत ओढून नेले. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक, यावल वनविभागाचे श्री. जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक श्री. समाधान पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सुनिल मिलावे (यावल पश्चिम), श्री. स्वप्निल फटांगरे (यावल पूर्व) व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आमदार श्री. चंद्रकांत सोनवणे यांनीही घटनास्थळी भेट देत मयत चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेतली व वनविभागाला आवश्यक सूचना दिल्या.
मयत रत्नाच्या वारसांना शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई मिळण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. तसेच घटनास्थळावरून स्वॅब सॅम्पल घेण्यात आले असून, ते नागपूर येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.
गेल्या एका महिन्यात यावल तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने परिसरात शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागाने बिबट्याचा शोध घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरे, थर्मल ड्रोन, व इतर उपकरणांद्वारे परिसरात चौकस नजर ठेवण्याचे काम सुरू केले आहे. स्थानिकांमध्ये जनजागृतीसाठी दवंडी देण्यात येत आहे तसेच गस्त सुरू आहे.
या मोहिमेसाठी यावल वनविभागाची ART टीम सक्रिय असून नाशिक येथील RESQ टीमला पाचारण करण्यात आले आहे. तसेच HHT टीम आणि मानद वन्यजीव रक्षक श्री. रविंद्र फाळक यांची मदत घेतली जात आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन), यावल पूर्व-पश्चिमचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी परिसरातील गावांत जाऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम