डीपीचा शॉक लागून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू

बातमी शेअर करा...

डीपीचा शॉक लागून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू

१४ वर्षीय मित्रजखमी ; भुसावळ शहरातील घटना

भुसावळ प्रतिनिधी : शहरातील दीनदयाल नगरातील ठाकूर गल्लीत बुधवारी सकाळी घडलेल्या भीषण दुर्घटनेत दुर्गेश दीपक ठाकूर (वय ९) या बालकाचा उघड्या वीज डीपीचा शॉक लागून मृत्यू झाला. तर त्याचा मित्र प्रणय गिरीश रूल्हे (वय १४) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सकाळी सुमारे १०.३० वाजता घडली असून परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गेश आणि प्रणय सकाळी ठाकूर गल्लीत पतंग उडवत होते. खेळता खेळता दोघांचा हात जवळील वीज वितरण कंपनीच्या डीपीला लागला. डीपीचा दरवाजा पूर्णपणे उघडा आणि असुरक्षित स्थितीत असल्याने दोघांना जोरदार विजेचा धक्का बसला. धक्का बसताच दुर्गेश कोसळला. नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. प्रणय गंभीर जखमी अवस्थेत उपचाराधीन आहे.

स्थानिकांनी आरोप केला आहे की, डीपी बराच काळ उघडाच होता आणि त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. परिणामी या निष्काळजीपणामुळे निरपराध मुलाचा बळी गेला, असा नागरिकांचा आरोप आहे.

दुर्गेश हा पालिकेच्या शाळा क्र. ३५ मध्ये चौथीत शिकत होता. त्याचा एक लहान भाऊ असून आई-वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणाची नोंद बाजारपेठ पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.
परिसरातील नागरिकांनी डीपी तातडीने सुरक्षित करण्याची मागणी केली असून महावितरणच्या निष्काळजीपणाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम