डुलकी लागल्याने टँकर उभ्या ट्रॉलावर जाऊन धडकला; सुदैवाने जीवितहानी टळली

बातमी शेअर करा...

डुलकी लागल्याने टँकर उभ्या ट्रॉलावर जाऊन धडकला; सुदैवाने जीवितहानी टळली
आकाशवाणी चौकात सकाळच्या सुमारास अपघात; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

जळगाव : प्रतिनिधी
नागपूरहून धुळ्याकडे निघालेल्या टँकरच्या चालकाला अचानक डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून टँकरने विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या ट्रॉलावर जोरदार धडक दिल्याची घटना रविवार, दि. १५ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शहरातील आकाशवाणी चौकात घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

गुजरातमधील वापी येथून बगिलर नावाच्या टँकर्सह एक ट्रॉला (क्रमांक – CG 07 CA 4682) विहारकडे जात होता. हा ट्रॉला जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात सिग्नलजवळ रस्त्याच्या कडेला उभा होता. याच दरम्यान नागपूरहून धुळ्याकडे निघालेला टँकर (क्रमांक – GJ 16 AW 9615) अचानक ट्रॉला जवळ येऊन धडकला.

टँकरचा चालक निशांत सिंग (वय २३, रा. पिलीभीत, उत्तर प्रदेश) याला गाडी चालवित असताना अचानक झोप अनावर झाली. परिणामी, वाहनावरील ताबा सुटला आणि टँकर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला घुसून ट्रॉलावर धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे पुढील भाग चकणाचूर झाले.

अपघाताच्या वेळी ट्रॉला चालक विरेंद्र जाधव (वय ३५, रा. नालंदा, बिहार) हा ट्रॉला शेजारीच होता, मात्र सुदैवाने तो थोडक्यात बचावला.

दरम्यान, अपघातामुळे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्हापेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहने रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचे चालक व संबंधितांना अधिक चौकशीसाठी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम