
डॉ. के.बी. पाटील यांची राष्ट्रीय केळी संशोधन सल्लागार समितीवर निवड
डॉ. के.बी. पाटील यांची राष्ट्रीय केळी संशोधन सल्लागार समितीवर निवड
जळगाव (प्रतिनिधी) : जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ व उपाध्यक्ष डॉ. के.बी. पाटील यांची नुकतीच राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, त्रिची (तामिळनाडू) यांच्या संशोधन सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीमार्फत झालेली ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे. केळी संशोधन क्षेत्राला दिशा देणाऱ्या या महत्त्वपूर्ण समितीवर डॉ. पाटील यांची झालेली निवड ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
केळी पिकातील तीन दशकांचा अमूल्य अनुभव
डॉ. के.बी. पाटील गेल्या तीन दशकांपासून केळी पिकाच्या विकास, उत्पादन, हाताळणी आणि निर्यात क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी जैन टिश्यूकल्चरच्या माध्यमातून केळी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाची क्रांती घडवून आणली. त्यांनी विकसित केलेली गादीवाफा पद्धत, मल्चिंग, फर्टिगेशन, फ्रुट केअर, तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापनाची वैज्ञानिक मांडणी देशभरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे.
‘जैन टिश्यूकल्चर ग्रॅडनैन’ या विदेशी जातीस देशभर प्रसिद्ध करून त्यांनी भारतीय केळी उत्पादनात नवे मापदंड स्थापित केले. जगभरातील प्रमुख केळी उत्पादक देशांना भेटी देऊन त्यांनी केळी उत्पादनाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासात मोठे योगदान दिले आहे.
त्यांच्या या बहुमूल्य योगदानाची दखल घेत त्रिची येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या सल्लागार समितीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पाटील यांच्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, ही निवड केळी पिकाच्या संशोधन क्षेत्रासाठी निश्चितच लाभदायक ठरणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम