
डॉ. शिवाजी सिताराम पाटील ‘मानद डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित
नवी दिल्ली: शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत, सरस्वती विद्या प्रसारक मंडळ, सतखेडा (ता. धरणगाव, जि. जळगाव) चे अध्यक्ष डॉ. शिवाजी सिताराम पाटील यांना नवी दिल्ली येथे ‘मानद डॉक्टरेट’ पदवी आणि ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातून हा सन्मान प्राप्त करणारे ते एकमेव शिक्षणतज्ज्ञ ठरले आहेत.
नासा ट्रस्टच्या एसएसआर विद्यापीठाने डॉ. पाटील यांना ‘महाराष्ट्रातील आदिवासी व ग्रामीण शाळांमध्ये नवोन्मेषी शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी’ या विषयावरील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा बहुमान दिला आहे. दिल्लीतील विश्व युवक केंद्रात आयोजित या सोहळ्याला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आय.जी. बीएसएफ पी. के. मिश्रा आणि उत्तराखंड उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती राजेश टंडन होते. सर्व मान्यवरांनी डॉ. पाटील यांच्या ‘ग्रामशाळा ते डिजिटल शाळा’ या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
अर्धशतकाहून अधिक काळ शिक्षणासाठी वाहून घेतलेले जीवन म्हणजे डॉ. पाटील यांचे कार्य. त्यांनी सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, नैतिक मूल्ये आणि तंत्रज्ञान-आधारित अभ्यासक्रमांचा पाया रचला. त्यांच्या प्रयत्नांमुळे गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, भोजन आणि निवासव्यवस्था उपलब्ध झाली. यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजात आपले स्थान निर्माण केले.
हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. पाटील भावूक झाले. “हा सन्मान केवळ माझा नसून, माझ्या सहकाऱ्यांचा, शिक्षकांचा, पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आहे. हे आमच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे,” असे त्यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातून प्रथमच असा सन्मान मिळाल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. दिल्लीतील ‘ऑल इंडिया गुर्जर समाज मंडळाने’ देखील त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. हा सन्मान केवळ डॉ. पाटील यांचाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक कार्यकर्त्यांचा गौरव आहे, असे मत व्यक्त होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम