
तरुणावर झालेल्या अमानुष सामूहिक मारहाणीच्या घटनेचा जिल्हा एकता संघटनेचा तीव्र निषेध; आरोपींवर मकोका लावण्याची मागणी
तरुणावर झालेल्या अमानुष सामूहिक मारहाणीच्या घटनेचा जिल्हा एकता संघटनेचा तीव्र निषेध; आरोपींवर मकोका लावण्याची मागणी
जळगाव – जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे सुलेमान रहीम खान पठाण (वय २१) या तरुणावर झालेल्या अमानुष सामूहिक मारहाणीच्या घटनेत पीडिताचा मृत्यू झाल्याने जिल्हा एकता संघटनेने तीव्र संताप व्यक्त करत आरोपींवर मकोका लावून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
१२ ऑगस्ट २०२४ रोजी संघटनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात घटनेची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी एसआयटीमार्फत करण्याची, दोषींवर भारतीय न्याय संहितेनुसार कडक कारवाई करून ९० दिवसांत चार्जशीट दाखल करण्याची, पीडिताच्या कुटुंबाला किमान २५ लाख रुपयांची आर्थिक मदत व सरकारी नोकरी देण्याची, तसेच गावात पोलिस बंदोबस्त वाढवून धार्मिक सलोखा राखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.
संघटनेने प्रशासनाला इशारा दिला की, दोषींवर तत्काळ कारवाई न झाल्यास आणि पीडित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. हे निवेदन अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांना अशोक लाडवांजरी यांच्या हस्ते, तर अपर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना मतीन पटेल यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच अल्पसंख्याक आयोग, मानवाधिकार आयोग व मंत्री गिरीश महाजन यांना देखील प्रशासनामार्फत आणि थेट निवेदन पाठविण्यात आले आहे.
या वेळी जिल्हा एकता संघटनेचे अशोक लाडवांजरी, फारुक शेख, मुफ्ती खालिद, हाफिज रहीम पटेल, अनिस शाह, मतीन पटेल, मौलाना गुफरान, हाफिज इमरान काकर, जावेद मुल्लाजी, आसिफ इस्माईल, रज्जाक पटेल, कासिम उमर, नजमोद्दीन शेख, आरिफ देशमुख, युसुफ खान यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम