तरूण विद्यार्थ्यांनी साहित्यातून ही संवेदनशीलता बाळगावी -ज्येष्ठ लेखक-कवी अशोक कोतवाल

विद्यापीठात लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन

बातमी शेअर करा...

विद्यापीठात लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी ) : साहित्यिकांना पडणारे प्रश्न एकट्याचे नसतात तर समुहाचे असतात. त्या प्रश्नांचे उत्तर शोधतांना तो सभोवतालाकडे संवेदनशीलतेने बघत असतो, त्या संवेदनशीलतेला प्रतिभा म्हटले जाते. तेव्हा तरूण विद्यार्थ्यांनी साहित्यातून ही संवेदनशीलता बाळगावी असे आवाहन ज्येष्ठ लेखक-कवी अशोक कोतवाल यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्रातर्फे शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्यिक अशोक कोतवाल व चित्रकार तथा लेखक राजू बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

अशोक कोतवाल म्हणाले की, शाळेत शिकतांना ना.धों. महानोर यांची कविता ऐकली तिचा प्रभाव पडला. पुढे जी पुस्तके मिळतील ती वाचत गेलो. सर्व प्रकारचे साहित्य वाचले. पुस्तकांच्या या वाचनामुळे काय लिहावे आणि काय लिहू नये ही सांगणारी व्यक्ती माझ्या आत जन्माला आली त्यातून मी घडत गेलो आणि लिहू लागलो. साहित्यमूल्य असलेल्या अंकांसाठीच लिहायचे हे मी ठरवले. आता तरूण पिढी विचार करणे विसरली आहे. शब्दांमध्ये ताकद असते. अराजकतेवर कवी आणि लेखकांनी हल्लाबोल करावा असे सांगतांना तरूण पिढीने अधिक पुस्तके वाचावीत कारण पुस्तके संवेदनशील बनवतात असे ते म्हणाले.

राजू बाविस्कर आपल्या मनोगतात म्हणाले की, चांगली माणसे आणि चांगली पुस्तके माझ्या हाती लागल्यामुळे दृष्टी प्राप्त झाली. माझ्या चित्रांमध्ये चेहरा नसलेली माणसे आणि गावगाडा आणला. वाचनातून केवळ लेखन होते असे नाही तर, चित्रही निर्माण होत असते. काळ्या, निळ्या रेषा या माझ्या आत्मकथनात माझा प्रवास मांडला असल्याचे त्यांनी सांगितले. हात आणि ब्रश हा चित्रकाराच्या अवयवाचा भाग झाला पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक विजय आहेर यांनी प्रास्ताविक केले. सुरेखा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व पाहुण्यांचा परिचय करून दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम