
तापी नदीपात्रात बेपत्ता वृद्धाने घेतली उडी
फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
तापी नदीपात्रात बेपत्ता वृद्धाने घेतली उडी
फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
फैजपूर प्रतिनिधी
शहरातील तापी नदीपात्रात अकलूद (ता. यावल) येथील ६५ वर्षीय पीठ गिरणी चालकाचा मृतदेह बुधवारी (१२ मार्च) सकाळी १० वाजता आढळून आला. प्रभाकर कडू पाटील (वय ६५, रा. अकलूद, ता. यावल) असे मयताचे नाव आहे. फैजपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रभाकर पाटील हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच त्यांचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळून आल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
बुधवारी सकाळी १० वाजता तापी नदीपात्रात मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आला. नागरिकांनी याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. मात्र, घटनास्थळ फैजपूर हद्दीत असल्याने फैजपूर पोलिसांना कळवण्यात आले. सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील, हवालदार मोती पवार, विकास सोनवणे आदींनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही
प्रभाकर पाटील यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनानंतर बुधवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी हवालदार मोती पवार यांच्या खबरीनुसार फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम