
तिघांना मुरुमाने भरलेल्या ट्रकने चिरडले !
तिघांना मुरुमाने भरलेल्या ट्रकने चिरडले !
संशयित तरुणाला अटक ; डॉ. महेश्वर रेड्डी यांची माहिती
जळगाव प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील जळगाव खुर्द गावाजवळील पुलाच्या बांधकामस्थळी मंगळवारी (११ मार्च) पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत उत्तर प्रदेशातील तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास करून २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मृतांमध्ये योगेश कुमार राजबहादुर (वय १४, रा. सीढपुरा, कासगंज, उत्तर प्रदेश), शैलेंद्रसिंग नथूसिंग राजपूत आणि भूपेंद्र मीथीलाल राजपूत (दोघे रा. दलेलपूर, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. हे तिघेही मजूर जळगाव खुर्द येथील पुलाच्या बांधकामावर कार्यरत होते. सोमवारी (१० मार्च) रात्री काही मजूर गावाला गेले होते, मात्र हे तिघे बांधकामस्थळीच झोपले होते. पहाटे अचानक भरधाव वाहन त्यांच्या अंगावरून गेले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सखोल चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मदतीने पोलिसांना माहिती मिळाली की अपघात मुरुमाने भरलेल्या डंपरने केला आहे. या माहितीच्या आधारे संशयित आरोपी प्रकाश सुदामाकुमार पटेल (वय २३, रा. उफरवली, मध्य प्रदेश) याला नशिराबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले.
मृत मजूर उत्तर प्रदेशातील आपल्या गावी होळी साजरी करण्यासाठी जाण्याच्या तयारीत होते. सकाळी आवरून ते गावी जाणार होते, पण दुर्दैवाने त्यांचा प्रवास सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.सी. मनोरे यांनी भेट दिली. तपास पथकात हेड कॉन्स्टेबल उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, जावेद शहा, राहुल वानखेडे यांनी मोलाची भूमिका बजावली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम