
तिरुपती–हिस्सार एक्सप्रेसला धरणगावात थांबा; प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण
तिरुपती–हिस्सार एक्सप्रेसला धरणगावात थांबा; प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण
खासदार स्मिताताई वाघ आणि प्रवासी मंडळाच्या प्रयत्नांना यश, नागरिकांत आनंदाचे वातावरण
धरणगाव – धरणगाव तालुका व परिसरातील प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. तिरुपती–हिस्सार एक्सप्रेस या गाडीला धरणगाव स्टेशनवर थांबा मिळाल्याने हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या पाठपुराव्याबरोबरच धरणगाव तालुका प्रवासी मंडळाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा थांबा शक्य झाला. या निर्णयाचे नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले.
ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा
मंगळवार, दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते शिरीषअप्पा बयस यांच्या हस्ते तिरुपती–हिस्सार एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यावेळी धरणगावकरांसाठी हा क्षण ऐतिहासिक ठरला. या कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन, गटनेते कैलास माळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
प्रवासी मंडळाच्या धडपडीचे फळ
या सोहळ्यात धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष व डीआरयूसीसी सदस्य महेंद्र कोठारी, उपाध्यक्ष रवींद्र भागवत, सचिव एस. डब्ल्यू. पाटील, सहसचिव किरण वाणी आदींसह मंडळातील सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. थांबा मिळवून देण्यासाठी त्यांच्या सततच्या प्रयत्नांचे यश नागरिकांना अनुभवता आले. प्रा. अरुण शिंदे, प्रा. एस. झेड. पाटील यांच्यासह उदय भावे हे प्रथम प्रवासी म्हणून सहभागी झाले.
विद्यार्थी आणि तरुणांसाठी दिलासा
तिरुपती–हिस्सार एक्सप्रेसच्या थांब्यामुळे आता धरणगावकरांना थेट अनेक शहरांशी रेल्वे संपर्क मिळणार आहे. नोकरी, शिक्षण आणि अन्य कारणांसाठी बाहेरगावी जाणाऱ्या तरुणांना व विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. या सोयीमुळे धरणगावचा प्रवासी दळणवळण अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम