
तीस वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
चार जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील अयोध्या नगर परिसरातील एक धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. आकाश पंडीत भावसार (वय ३०) या तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रात्री अकराच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगरजवळील हॉटेल ए-वनच्या परिसरात घडली.
आकाश भावसार ट्रान्सपोर्ट नगर येथे वाहन भरण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून आकाशचा पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू होता.
शनिवारी रात्री आकाशला हॉटेल ए-वनजवळ अडवून काही व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी मांडी, छाती आणि गुप्तांगावर सपासप वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. नागरिकांच्या मदतीने तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चार संशयितांची नावे समोर आली असून, त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती.
त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम