
त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून वीर बाल दिवस साजरा
त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून वीर बाल दिवस साजरा
डॉ. एस. ए. पाटील यांचे प्रतिपादन
ऐनपूर (ता. रावेर) : येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने वीर बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. पी. आर. महाजन होते, तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. एस. ए. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना डॉ. एस. ए. पाटील यांनी २६ डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो, असे सांगून गुरु गोबिंद सिंगजी यांच्या दोन धाकट्या पुत्रांचे — साहिबजादा जोरावर सिंग व साहिबजादा फतेह सिंग — अतुलनीय शौर्य, त्याग आणि बलिदान यांचे स्मरण या दिवशी केले जाते, असे स्पष्ट केले. मुघल साम्राज्याने भिंतीत चिणून दिलेल्या या बालवीरांचे बलिदान देशातील मुलांना देशभक्ती, साहस आणि त्यागाचे महत्त्व शिकवणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. पी. आर. महाजन यांनी साहिबजाद्यांच्या त्याग आणि बलिदानाची माहिती देत, हा दिवस गुरु गोबिंद सिंग यांच्या दोन लहान मुलांच्या सर्वोच्च बलिदानाची आठवण म्हणून साजरा केला जातो, ज्यांनी धर्मरक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव, डॉ. एस. बी. पाटील, प्रा. हेमंत बाविस्कर, प्रा. व्ही. एच. पाटील, अंकुर पाटील, प्रा. एस. पी. उमरीवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षल पाटील, अनिकेत पाटील व श्रेयस पाटील यांनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम