दगडी बँक’ विक्रीचा निर्णय तातडीने रद्द करा : आ. एकनाथ खडसे यांची मागणी

बातमी शेअर करा...

दगडी बँक’ विक्रीचा निर्णय तातडीने रद्द करा : आ. एकनाथ खडसे यांची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘दगडी बँक’ इमारतीच्या विक्रीसंदर्भात जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, “दगडी बँक विक्रीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा शेतकऱ्यांसह ‘दगडी बँक बचाव’ मोहीम उभारली जाईल” असा इशारा दिला आहे.

आ. खडसे म्हणाले की, “सदर इमारत ही जिल्हा बँकेची स्वतःची मालमत्ता असून, तिच्यावर कोणतेही कर्ज नाही. शेजारील जागेच्या बाजारभावानुसार या मालमत्तेची किंमत किमान ६५ कोटी रुपयांहून अधिक आहे. मग अशी मौल्यवान मालमत्ता विक्रीस काढण्याची गरजच काय? संचालक मंडळाला पूर्वजांनी निर्माण केलेल्या या ऐतिहासिक वास्तूची विक्री करण्याचा अधिकार कोणी दिला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, “ही इमारत केवळ एक वास्तू नसून, जिल्हा बँकेचा इतिहास, ओळख आणि वारसा आहे. पहिल्या चेअरमनपासून ते आजपर्यंत सर्व प्रमुखांनी या दगडी वास्तूतूनच बँकेचा कारभार हाकला आहे. त्यामुळे लाखो शेतकरी, खातेदार आणि नागरिकांच्या भावना या इमारतीशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे विक्रीचा निर्णय हा भावनिकदृष्ट्याही अयोग्य आणि असंवेदनशील आहे.”

आ. खडसे यांनी यावेळी बँकेतील २२० कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावित भरतीबाबतही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “राज्य सरकारने जिल्हा बँकेतील २२० कर्मचाऱ्यांची भरती करण्यास परवानगी दिली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र ही भरती आयबीपीएस सारख्या पूर्णपणे पारदर्शक एजन्सीमार्फत केली जावी, अशी आमची ठाम मागणी आहे. मागील भरती प्रक्रियेत एकही तक्रार आली नव्हती; त्यामुळे याही भरतीत पारदर्शकता अबाधित ठेवावी.”

सचिवांकडून काही लोकांकडून २० हजार रुपये मागितल्याची तक्रार प्राप्त झाल्याचे सांगत आ. खडसे म्हणाले की, “अशा प्रकारच्या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या लोकांवर तातडीने कारवाई केली पाहिजे. जिल्हा बँकेचा कारभार पारदर्शक व शेतकरीहिताचा असावा, यासाठी आमचे सहकार्य राहील. परंतु चुकीचे आणि भावनिक पातळीवर असंवेदनशील निर्णय त्वरित मागे घ्यावेत.”

ते पुढे म्हणाले की, “बँकेला सध्या आर्थिक अडचण नाही. जर एनपीए कमी करायचा असेल, तर धरणगाव तालुक्यातील बेकायदेशीर केळी लागवडीवर दिलेली कर्जे वसूल करण्याकडे लक्ष द्यावे, न की वारसाहक्काची ‘दगडी बँक’ विकण्याकडे.”

आ. खडसे यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे जिल्हा बँकेच्या कारभारावर आणि ‘दगडी बँक’ विक्री निर्णयावर नव्याने चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम