
दरोडेखोर-पोलिसांमध्ये नवी मुंबईत फिल्मी स्टाईल थरार
नवी मुंबई: दरोडा टाकण्यासाठी वाशीमध्ये आलेल्या सहा जणांच्या टोळीचा सोमवारी पहाटे पोलिसांनी थरारक पाठलाग केला. मात्र, दरोडेखोरांनी वाशीतील सागर विहार परिसरात पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता एकाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले, तर पाचजण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. गुन्ह्यासाठी वापरातील गाडी व दरोड्यासाठीचे साहित्य पोलिसांना सापडले असून, फरार झालेल्यांचा
शोध पोलीस घेत आहेत. वाशी परिसरात काही दरोडेखोर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट २च्च्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे युनिट २चे पथक सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास लाल रंगाच्या तवेरा कारचा माग काढत वाशीमध्ये आले. या वेळी गन्हें शाखेच्या
पथकाला दरोडेखोरांची संशयित कार निदर्शनास आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने व वाशी पोलिसांनी या दरोडेखोरांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग सुरू केला. या वेळी सर्व दरोडेखोर वाशीतील सागर विहार परिसरात गेल्यानंतर त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी दरोडेखोरांना शरण येण्यास सांगितले. मात्र, या वेळी दरोडेखोरांनी पोलीस पथकाच्या अंगावर तवेरा कार घालून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात पोलीस थोडक्यात बचावले.
या वेळी दरोडेखोरांच्या कारची इतर दोन वाहनांना धडक झाल्यानंतर तवेरा कारमधील दरोडेखोरांनी आपली कार त्याच ठिकाणी सोडून सागर विहारलगतच्या खाडीकिनारी पळ काढला, या वेळी त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता, सदर टोळीचा प्रमुख परमजित पोमण सिंग, ऊर्फ नागेश, नागराज (४३) हा पोलिसांच्या
हाती लागला. मात्र सरदार, नेपाली थापा, हसन, नेपाली आणि हसनचा मित्र हे पाचजण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर पोलिसांनी या दरोडेखोरांच्या तवेरा कारची तपासणी केली असता, त्यात १ हायड्रोलिक कटर, ५ स्कू ड्रायव्हर, १ पक्कड, १ कटावणी, १ लोखंडी रॉड, १ रस्सी बंडल, ४ गोणी व ५ मोठ्या पिशव्या, हॅन्डग्लोज जोड, ५ कैचीची पाती, ३ मिरचीपुड पाकिटे आदी दरोडा टाकण्यासाठी लागणारे हत्यार आणि साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली. तसेच पकडलेल्या एका दरोडेखोरासह पळून गेलेल्या त्याच्या साथीदाराविरोधात दरोड्याचा प्रयत्न, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, अशा विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही धुमाळ यांनी सांगितले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम