
दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्य टोळी पोलिसांच्या जाळ्यात; भुसावळमध्ये उशिरा रात्री कारवाई
दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्य टोळी पोलिसांच्या जाळ्यात; भुसावळमध्ये उशिरा रात्री कारवाई
भुसावळ प्रतिनिधी – नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढवलेल्या विशेष गस्तीदरम्यान भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री जवळपास एक मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील आंतरराज्य दरोडेखोर टोळीचा कट उधळून लावला. रात्री सुमारे ११.१० वाजता काळा हनुमान मंदिरासमोरील भाजी मंडई परिसरात आदर्श पॅकेजिंग दुकानाच्या मागील बाजूस काही व्यक्ती संशयास्पद हालचाल करताना दिसताच पथकाने तत्काळ धाड टाकली. अचानक कारवाईमुळे तीन आरोपी पळता पळता पकडले गेले, तर उर्वरित पाच साथीदार अंधाराचा आधार घेत पसार झाले.
पोलिसांच्या हाती लागलेल्या आरोपींमध्ये शुभम दुर्गाप्रसाद ओनकर (२४, पोखरणी, ता. खिडकिया), मृत्युंजय उर्फ भोला संत्येंद्र कवीशेखर (४३, बंगाली कॉलनी, हरदा) आणि राजू उर्फ शिवकुमार माणिक (१९, मंगल बाजार, खिडकिया) यांचा समावेश असून, तिघांनीही पोलिसांना पाहताच पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने पाठलाग करून त्यांना तात्काळ जेरबंद केले.
घटनास्थळी सापडलेल्या साहित्यावरून टोळीच्या दरोड्याच्या तयारीचा स्पष्ट सुगावा लागला. गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, १२ इंची चॉपर, मिरची स्प्रे, २० फूट दोरी, तसेच तीन बिननंबर मोटारसायकली—बजाज पल्सरच्या दोन (काळी व राखाडी) आणि एक अपाची झ (लाल)—असा जवळपास १.५० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दोन मोबाईल फोनही ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत आरोपींनी उघड केले की भुसावळातील बंटी परशुराम पथरोड, शिव पथरोड, अभिषेक जवाहरलाल गौर आणि तेजस चंद्रकांत टकले यांनी त्यांना सराफ बाजारातील दुकाने तसेच काही धनाढ्य नागरिकांच्या बंगल्यांवर दरोडा टाकण्यासाठी बोलावले होते. स्थानिक साथीदारांनी संभाव्य ‘टार्गेट’ दाखवत बुधवारी रात्री ही कृती करण्याची सूचना दिल्याचेही त्यांनी कबूल केले.
फरार आरोपींमध्ये मयूर टाक, आशिष चोटी, विरेंद्र कडोले उर्फ भय्यू येडा, हनी ठाकुर आणि एक अज्ञात साथीदार यांचा समावेश असून सर्वांचा शोध पोलिसांनी वेगाने सुरू केला आहे. पो.हे.कॉ. विजय नेरकर यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश जाधव व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम