
दसऱ्याला दुकान सुरू करण्याआधीच दीड लाखांचे भांडे गायब
दसऱ्याला दुकान सुरू करण्याआधीच दीड लाखांचे भांडे गायब
हतनूर कॉलनीतील घरातून चोरट्यांनी केली चोरी
प्रतिनिधी | जळगाव शहरातील हतनूर कॉलनी भागात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दुकान सुरू करण्यापूर्वीच चोरट्यांनी दीड लाख रुपयांचे महागडे भांडे चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २८ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत घडली असून, सुरुवातीला पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद घेतली होती. मात्र तक्रारदाराने वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर १५ दिवसांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश बबन रंधे (वय ४५, रा. रायसोनी नगर, जळगाव) हे पाटबंधारे विभागात अभियंता आहेत. त्यांना मायादेवी मंदिराजवळील हतनूर कॉलनीत सरकारी क्वॉर्टर मिळाले आहे. रंधे हे गेल्या दोन वर्षांपासून भांडे विक्रीसाठी विविध नामांकित कंपन्यांचे सुमारे ४ ते ५ लाख रुपये किंमतीचे महागडे भांडे आणि साहित्य जमा करीत होते. दसऱ्याला दुकानाचा शुभारंभ करण्याची त्यांची योजना होती.
मात्र नियोजित उद्घाटनापूर्वीच २८ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे भांडे चोरून नेले. काही भांडे तेथेच टाकून चोरटे पसार झाले.
चोरीची माहिती मिळताच रंधे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र प्राथमिक तक्रारीवर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे रंधे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांची भेट घेतली आणि संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.
श्री. गणापुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करत तत्काळ तपासाचे आदेश दिल्यानंतर अखेर १० ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचे आणि संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम