
दहशत माजविणारा सराईत अमीर काकरवर एमपीडीएअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध
दहशत माजविणारा सराईत अमीर काकरवर एमपीडीएअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध
जळगाव I शहरात दहशत निर्माण करणारा कुख्यात सराईत गुन्हेगार समीर हनीफ काकर (२२, रा. तांबापुरा, जळगाव) याला अखेर एमपीडीए कायद्यान्वये पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. ही माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील समीर काकर याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबर दुखापत, घरफोडी अशा स्वरूपाचे एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो तांबापुरा, मेहरुण आणि जळगाव परिसरात नागरिकांना विनाकारण मारहाण, शिवीगाळ करून दहशत माजवीत होता. यापूर्वी त्याला एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, हद्दपारीनंतरही त्याची गुन्हेगारी सुरूच राहिली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याने त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ४ सप्टेंबर रोजी येरवडा कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश काढले.
त्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र २४ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने (पु.उ.नि. चंद्रकांत धनके, पो.ना. प्रदीप चौधरी, पो.कॉ. विशाल कोळी व गणेश ठाकरे) पुण्यात सापळा रचून २५ सप्टेंबर रोजी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि तातडीने येरवडा कारागृहात दाखल केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम