
दापोलीतून “एक राखी जवानांसाठी” अभियान; पठाणकोट व मुंबईतील जवानांसाठी राख्या रवाना
दापोलीतून “एक राखी जवानांसाठी” अभियान; पठाणकोट व मुंबईतील जवानांसाठी राख्या रवाना
दापोली, – कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान संचालित ‘युवा प्रेरणा कट्टा’तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही “एक राखी जवानांसाठी – देशाच्या रक्षकांसाठी” हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. भारतीय सैन्यदलाच्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, देशाच्या सीमेवर जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम विशेष ठरला.
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर आदरांजली
हालचाली सुरू असलेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानी आतंकवाद्यांना प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करत, यावर्षीच्या अभियानाचे स्वरूप ठरविण्यात आले. यामध्ये दापोलीतील विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थिनी आणि नागरिक महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जवानांसाठी शेकडो राख्या तयार केल्या.
युवांची समर्पित तयारी
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद पांगारकर, नचिकेत बेहरे, संदीप गरंडे, श्रीप्रीती वैद्य, साक्षी करमरकर, सुमेध करमरकर, रोहन भावे यांच्यासह ‘युवा प्रेरणा कट्टा’ टीमच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
मिहीर महाजन यांची माहिती
उपक्रमाबाबत माहिती देताना मिहीर महाजन म्हणाले, “२०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने या उपक्रमाची सुरुवात झाली. पहिल्या वर्षी ७५ हून अधिक शाळा व महाविद्यालयांतून राख्या जमा करून सीमेवर पाठवण्यात आल्या. तेव्हापासून हा उपक्रम नियमितपणे राबविला जातो.”
पठाणकोट आणि मुंबईतील जवानांसाठी राख्यांची भेट
यावर्षी संकलित झालेल्या राख्या पठाणकोट (पंजाब) येथील भारतीय वायू सेनेच्या हवाई तळावरील जवानांना, तसेच मुंबईतील सशस्त्र सेना सामान चिकित्सा डेपो येथील कार्यालयात पाठवण्यात आल्या आहेत. या उपक्रमातून देशसेवेतील जवानांशी एक भावनिक नातं निर्माण होत असून, समाजात देशभक्तीचे बाळकडू रुजवले जात असल्याचे जाणकारांनी मत व्यक्त केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम