
दिल्ली स्फोटाचा सून्नी मुस्लिम बांधवांतर्फे निषेध
दिल्ली स्फोटाचा सून्नी मुस्लिम बांधवांतर्फे निषेध
अतिरेक्यांना फासावर लटकविण्याची मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव प्रतिनिधी : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ सोमवारी घडलेल्या भीषण बॉम्ब स्फोटाने देशभरात संतापाची लाट उसळली असून या घटनेचा निषेध करत आज जळगाव शहरातील सून्नी मुस्लिम बांधवांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी महामहिम पंतप्रधानांना उद्देशून निवेदन जिल्हाधिकारी सो. यांच्या मार्फत देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, “आपला भारत देश कधीही कोणावर आक्रमण करत नाही, मात्र देशावर कुणी हल्ला केल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्याची भारतीय सैनिकांची तयारी सदैव असते. दिल्लीतील स्फोट हा केवळ राजधानीवरील नव्हे, तर संपूर्ण भारतावर झालेला हल्ला आहे. निष्पाप नागरिकांचा जीव घेणाऱ्या या अमानुष कृत्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. या भ्याड हल्ल्यामागील अतिरेक्यांना तातडीने अटक करून फासावर लटकवावे.”
सोमवारी सायंकाळी लाल किल्ल्याजवळ चालत्या कारमध्ये झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २० नागरिक जखमी झाले आहेत. देशाच्या हृदयस्थानी झालेल्या या घटनेने सर्व स्तरांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
जळगावातील सून्नी जामा मस्जिद व सून्नी ईदगाह ट्रस्टच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, सय्यद उमर, हाजी सलीमुद्दिन शेख, अमान बिलाल, शफी शेख, शेख जमील, अमजद पठान, शाहिद पटेल, मोईन अली, मीर नाझीम अली, सलीम इनामदार, अशफाक शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम