
दिव्यांगत्वामुळे नैराश्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; भोकर गावात हळहळ
दिव्यांगत्वामुळे नैराश्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; भोकर गावात हळहळ
जळगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील भोकर गावात एक दुर्दैवी घटना घडली असून, दिव्यांगत्वामुळे नैराश्यात गेलेल्या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी, ५ जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मयत शेतकऱ्याचे नाव ज्ञानेश्वर प्रल्हाद पाटील (वय ३५, रा. भोकर, ता. जळगाव) असे आहे. ते आपल्या कुटुंबासोबत राहून शेती करून उदरनिर्वाह करीत होते. काही काळापासून ते शरीरातील दिव्यांगत्वामुळे मानसिक तणावात होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
शनिवारी दुपारी घरात कोणी नसताना त्यांनी छताला दोरी बांधून गळफास लावला. काही वेळाने कुटुंबीय घरी परतल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ ज्ञानेश्वर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेने कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून, भोकर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिव्यांगत्वामुळे आलेल्या नैराश्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम