
दुचाकी चोरीच्या दोन घटनांचा छडा; ईराणी मोहल्ल्यातून चोरटा जेरबंद
जळगाव: शहरातून दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला शनिपेठ पोलिसांनी भुसावळ येथील ईराणी मोहल्ल्यातून अटक केली आहे. दुसरीकडे, शनिपेठ पोलिसांना बेवारस सापडलेली चोरीची दुचाकी तिच्या मूळ मालकाला परत करण्यात यश आले आहे.
१४ ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना, ही दुचाकी भुसावळ येथील एका चोरट्याने चोरल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली.
त्यानुसार, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी पोलीस हवालदार प्रदीप नन्नवरे, शशिकांत पाटील, निलेश घुगे यांच्यासह पथकाला भुसावळला पाठवले. या पथकाने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपी हसनअली उर्फ आसू नियाज अली इराणी (वय २३, रा. पापा नगर, भुसावळ) याच्या पापा नगरातील घरातून त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली दुचाकीही हस्तगत केली आहे.
बेवारस सापडलेली दुचाकी मालकाला परत
दुसऱ्या एका घटनेत, जून महिन्यात शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्तव्यावर असलेले अंमलदार रवींद्र साबळे आणि निलेश घुगे यांना बेवारस स्थितीत एक दुचाकी (क्र. एमएच १९, बीएस ६६६२) मिळून आली होती.
पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रमोद पाटील यांनी या दुचाकीच्या मालकाचा शोध सुरू केला. तपासानंतर ही दुचाकी भुसावळ येथील योगेश नारायण सुरळकर यांची असल्याचे समोर आले. त्यांनी ही दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी खातरजमा करून ती दुचाकी योगेश सुरळकर यांच्या स्वाधीन केली आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम