
दुबार मतदारांचा शोध; मनपा अधिकारी रस्त्यावर
दुबार मतदारांचा शोध; मनपा अधिकारी रस्त्यावर
हरकती व तक्रारींची काटेकोर पडताळणी सुरू
जळगाव – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये तब्बल ३३ हजार ७७० दुबार नावे आढळून आली आहेत, तर विविध प्रभागांतून एकूण १८ हजार ९४६ हरकती व तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भातील पडताळणी प्रक्रियेचा वेग वाढवत मनपा प्रशासनाने शनिवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके शहरभर पाठवली. ही पथके प्रत्यक्ष नागरिकांच्या घरी भेट देत त्यांची कागदपत्रांसह तपासणी करीत आहेत.
दि. २० नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये अनेकांचे नावे चुकीच्या प्रभागात दाखल झाल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर दि. २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान १५ हजार ९५७ हरकती आणि २ हजार ९८९ तक्रारी मनपाकडे दाखल झाल्या. या सर्व प्रकरणांवरील योग्य तो निर्णय घेण्यासाठी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली १९ विशेष पथके तयार करण्यात आली असून या पथकांसोबत ७८ मनपा कर्मचारी कामाला लागले आहेत.
शनिवारी अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उप आयुक्त निर्मला गायकवाड-पेखळे यांच्या उपस्थितीत ही पडताळणी मोहीम सुरू झाली. शहरातील विविध प्रभागांत अधिकारी प्रत्यक्ष भेटी देत मतदारांची ओळख व कागदपत्रांची तंतोतंत तपासणी करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम