देवगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

बातमी शेअर करा...

देवगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील देवगाव शिवारात गुरुवारी दुपारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ६० वर्षीय इंदुबाई वसंत पाटील या वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दुपारी सुमारे १२.३० वाजता घडली असून, शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे.

प्राप्त माहितीनुसार, इंदुबाई पाटील या गट क्रमांक ५५ मधील स्वतःच्या शेतात काम करत असताना झाडीत लपून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर जखमा केल्यामुळे त्या रक्तबंबाळ अवस्थेत कोसळल्या. जवळच काम करणाऱ्या इतर मजुरांनी आरडाओरड करत हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस पाटील रमेश पाटील यांना याची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस पाटील रमेश पाटील व त्यांच्या चुलत भावाने चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी इंदुबाईंना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देवगाव परिसरात बिबट्याचे सतत दर्शन होत असल्याने ग्रामस्थ आधीच भयभीत होते. या घटनेनंतर वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे देवगाव व आसपासच्या परिसरात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम