“दोडे गुजर समाजाने पुढे यावे” ;  मंगल बी. पाटील यांचे आवाहन

बातमी शेअर करा...

“दोडे गुजर समाजाने पुढे यावे” ;  मंगल बी. पाटील यांचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी

गुजर समाज दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि सन्मानाच्या बाबतीत नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. तसेच शिक्षण, शेती, उद्योग, सामाजिक, धार्मिक आणि राजकारण क्षेत्रातही समाजाने आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. समाजातील चांगल्या परंपरांचा उल्लेख इतर समाज करतात आणि त्याचे अनुकरण देखील करतात. मात्र, काही जुन्या रूढी व परंपरा आजच्या काळात समाजाच्या प्रगतीत अडथळा ठरत असल्याची चर्चा अनेक ठिकाणी सुरू आहे.

पूर्वी विवाह ठरवताना गुणमेलन, रक्तगट, शिक्षण, वय किंवा शेती यापेक्षा दोन्ही कुटुंबांतील विचारसाम्य आणि संस्कारांना अधिक महत्त्व दिले जात होते, त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाणही अत्यल्प होते. आज शिक्षण आणि आधुनिकतेच्या वाढत्या प्रभावामुळे विवाहबंधन टिकविण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. यावर समाजाने आत्मचिंतन करणे अत्यावश्यक असल्याचे मत मांडण्यात आले.

मंगल बी. पाटील यांनी सांगितले की, “विवाहबंधन तुटल्यावर अनेक पालक समाजातील मान्यवरांना दोष देतात, मात्र प्रत्यक्षात दोन्ही कुटुंबांतील पालकही त्या परिस्थितीस काही प्रमाणात जबाबदार असतात, हे स्वीकारणे गरजेचे आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, “समस्या निर्माण झाल्यानंतर दोषारोप करण्याऐवजी, दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन संवाद साधून मार्ग काढण्याची गरज आहे. समाजातील मतभेद मिटविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.”

सध्याच्या काळात मुलींचे उच्च शिक्षण आणि नोकरीच्या संधींमुळे त्या गावाबाहेर राहत आहेत. याचे सामाजिक आणि कौटुंबिक दुष्परिणामही दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. “मुलगी म्हणजे संस्कार, आई-वडिलांचे प्राण आणि दोन कुटुंबांना जोडणारा दुवा आहे. त्यामुळे तिच्या भावी आयुष्याचा विचार करून योग्य परिवारात विवाह होण्यासाठी समाजाने समुपदेशन आणि मार्गदर्शन करणे आवश्यक आहे,” असे पाटील म्हणाले.

काही दिवसांपूर्वी जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल हॉलमध्ये रेवा गुजर समाजाचा वधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात ५०० हून अधिक वधू-वर सहभागी झाले असून, काही विवाह तेथून जुळलेही आहेत. या उपक्रमाचे कौतुक करताना मंगल बी. पाटील यांनी दोडे गुजर समाजानेही अशा उपक्रमात पुढे येण्याचे आवाहन केले.

त्यांनी सांगितले की, “मानपान, अहंकार यांना बाजूला ठेवून, वर्तमान काळाच्या गरजा लक्षात घेऊन समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे. ‘एकावे जनाचे, करावे मनाचे’ या तत्त्वावर समाजकार्य यशस्वी होते.”

‘वीर गुजर सेना’ या संघटनेच्या माध्यमातून लवकरच भव्य वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार असून, या कार्यक्रमासाठी पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि समाजातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पालकांनी वधू-वरांचे संपूर्ण बायोडाटा, फोटो आणि संपर्क क्रमांकासह माहिती २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पुढील क्रमांकांवर व्हॉट्सअॅपद्वारे पाठवावी —
श्री. नवलसिंग राजे पाटील, हेमंत पाटील (९५११२९५१७९), मंगल बी. पाटील (९७६५१२१७४१), राजेंद्र पाटील (९६८९४५९७९४), वसंतराव पाटील (९१५८०१४८८६), किरण संभाजी पाटील (९०२१४६१७०२), सौ. शोभाताई गौरख पाटील (९००४७८७४२२), निखिल सुनील चौधरी (९९६०७९९८४५).

या मेळाव्याद्वारे समाजातील युवक-युवतींना योग्य जोडीदार निवडण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळेल, असा विश्वास मंगल बी. पाटील यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम