
दोन चोरट्यांसह १६ लाखांच्या २४ दुचाकी हस्तगत
दोन चोरट्यांसह १६ लाखांच्या २४ दुचाकी हस्तगत
अमळनेर पोलिसांची कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) – शहरासह परिसरातील दुचाकी चोरीच्या मालिका अखेर उकलण्यात अमळनेर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. शहादा तालुक्यातील दोन सराईत चोरट्यांना शिताफीने अटक करून पोलिसांनी १५ लाख ६३ हजार रुपयांच्या २४ दुचाकी जप्त केल्या आहेत. या धाडसी कारवाईबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अमळनेर पोलिसांचे विशेष कौतुक करत रोख बक्षीस देऊन गौरव केला.
अलीकडच्या काही महिन्यांपासून अमळनेर शहर व परिसरात दररोज दुचाकी चोरीच्या घटना वाढत होत्या. नागरिक त्रस्त झाले असतानाच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्हे शोध पथक सक्रिय केले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, प्रशांत पाटील, गणेश पाटील, उज्ज्वलकुमार म्हस्के, नितीन मनोरे, उज्ज्वल पाटील आणि हितेश बेहरे यांचा समावेश होता.
पथकाने विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत संशयितांचे चेहरे ओळखले. तपासात दोन्ही आरोपी नंदुरबार जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी शहादा तालुक्यातील सातपिंप्री येथील हिंमत रेहंज्या पावरा आणि अंबालाल भुरट्या खर्डे या दोघांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहिम राबवली. आरोपी जंगलातून पलायन करत असल्याने पोलिसांना डोंगर, ओढे आणि पायवाटा पार करत अनेक किलोमीटर पायपीट करावी लागली. अखेर सततच्या पाठलागानंतर पोलिसांनी या दोघांना धडगाव परिसरातून ताब्यात घेतले.
पोलिसांनी चौकशीदरम्यान विचारणा केल्यानंतर आरोपींनी विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या २४ दुचाकींबाबत कबुली दिली. त्यांनी चोरलेल्या गाड्या काही गरीब लोकांना स्वस्त दरात विकल्याचेही उघड केले. पोलिसांनी जंगलातील विविध ठिकाणांहून सर्व २४ दुचाकी हस्तगत केल्या.
या दोन्ही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील चौकशीत आणखी काही गुन्ह्यांचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपास हे.कॉ. काशिनाथ पाटील आणि सागर साळुंखे करत आहेत.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी अमळनेर पोलिस पथकाचा गौरव करत त्यांना विशेष रोख बक्षीस जाहीर केले. पत्रकार परिषदेत डीवायएसपी विनायक कोते, पो.नि. दत्तात्रय निकम, पो.उ.नि. समाधान गायकवाड आणि शरद काकळीज उपस्थित होते.
या कारवाईनंतर अमळनेर परिसरातील नागरिकांनी पोलिस दलाचे कौतुक केले असून, वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम