
दोन मजले उतरून वृद्ध महिलेला दिली न्यायाधीशांनी नुकसान भरपाई
दोन मजले उतरून वृद्ध महिलेला दिली न्यायाधीशांनी नुकसान भरपाई
राष्ट्रीय लोकअदालत मध्ये २५ कोटी रुपयांची वसुली
जळगाव (प्रतिनिधी) – वृद्धापकाळामुळे न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जाता न आल्याने एका वृद्ध महिलेला न्याय नाकारला जाऊ नये म्हणून लोकअदालतमध्ये उपस्थित असलेले जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. खोंगल, न्या. एस. एन. राजूरकर व न्या. एस. एन. मोरवले यांनी स्वतः दोन मजले उतरून तिच्यापर्यंत पोहोचत नुकसानभरपाई मंजूर केली. या मानवी दृष्टिकोनातून घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शनिवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालय, कौटुंबिक, औद्योगिक, कामगार आणि सहकार न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित झाली. या लोकअदालतीत दाखलपूर्व ३ हजार ४२२ आणि प्रलंबित १ हजार ३१८ अशा एकूण ४ हजार ७४० प्रकरणांचा निपटारा झाला. यातून तब्बल २५ कोटी ५ लाख ५३ हजार २०६ रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. विशेष ड्राईव्हमध्ये ९८६ प्रकरणे सोडवली गेली.
अपघात दावे प्रकरणांमध्ये तडजोडी
मोटार अपघात दाव्यात अर्जदार सुष्मा तवर यांना कंपनीकडून २० लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली. तर दुसऱ्या प्रकरणात मनीषा रेभोटकर यांना १३ लाख ५० हजार रुपये तर अर्जदार रमेश दगडूलाल न्याती यांना ४ लाख ८० हजार रुपये मंजूर करण्यात आले. या प्रकरणांमध्ये अॅड. वाय. आर. गावंडे व अॅड. अक्षय समदाणे यांनी बाजू मांडली.
कौटुंबिक वाद मिटले, दाम्पत्यांचे मनोमिलन
लोकअदालतमध्ये विभक्त राहणारे विवेक व कोमल धांडे यांच्यात समजोता होऊन ते पुन्हा एकत्र नांदण्यास तयार झाले आणि घटस्फोट अर्ज मागे घेण्यात आला. यामध्ये अॅड. एस. ए. पाटील यांनी काम पाहिले. तर सोमनाथ व दीपिका कुमावत यांच्यातील २०२४ पासून सुरू असलेला वादही मिटवून दोघे पुन्हा एकत्र राहण्यास सहमत झाले.
स्टेट बँकेच्या ९८ खटल्यांत तडजोडी
स्टेट बँक ऑफ इंडियाने थकीत कर्जदारांविरोधात दाखल केलेल्या कलम २५ अंतर्गत ९८ फौजदारी खटल्यांमध्ये लोकअदालतमार्फत तडजोड घडवून आणण्यात आली. त्यामुळे संबंधितांचे खाते नियमित करण्यात आले. या प्रकरणांत अॅड. अमित चोरडिया यांनी कामकाज पाहिले.
या लोकअदालतीच्या माध्यमातून हजारो प्रकरणे मिटून नागरिकांना दिलासा मिळाला असून, कायदा सेवेमध्ये लोकअदालतींचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम