
धक्कादायक :शिवाजीनगर स्मशानभूमीतून अस्थी आणि दागिन्यांची चोरी
धक्कादायक :शिवाजीनगर स्मशानभूमीतून अस्थी आणि दागिन्यांची चोरी
जळगाव प्रतिनिधी
जळगाव : शिवाजीनगर स्मशानभूमीत मृत महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर अस्थी आणि दागिन्यांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी उघडकीस आला. सलग दुसऱ्या घटनेने नागरिकांमध्ये संताप पसरला असून, नातेवाइकांनी महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शिवाजीनगर परिसरातील खडके चाळ येथील रहिवासी जिजाबाई पाटील यांचे निधन झाले. अंत्यसंस्कारानंतर १३ ऑक्टोबर रोजी नातेवाईक स्मशानभूमीत आले असता, जिजाबाई पाटील यांची राख कवटी आणि पायाचा भाग गायब असल्याचे आढळले. तसेच, त्यांच्या अंगावरील ४ ग्रॅम दागिन्यांचीही चोरी झाल्याचे समोर आले. जिजाबाई यांनी मृत्यूपूर्वी दागिने त्यांच्यासोबत जावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती, असे नातेवाइकांनी सांगितले.
या घटनेमुळे नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त केला. घटनास्थळी आमदार राजूमामा भोळे यांनी पाहणी केली आणि महानगरपालिकेच्या निष्काळजी कारभारावर ताशेरे ओढले. “हा प्रकार नातेवाइकांच्या भावनांशी खेळणारा आहे. गेल्या काही दिवसांतील ही दुसरी घटना आहे. मनपा आयुक्तांना याबाबत जाब विचारणार असून, स्मशानभूमीत सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करतो,” असे त्यांनी सांगितले.नातेवाइकांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी आणि अशा घटना भविष्यात घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम