
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळा अंतर्गत बौद्ध अध्ययन व संशोधन केंद्रातर्फे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध धम्मातील हीनयान आणि महायानाचे तौलनिक विशेष या विषयावर दि. १४ ऑक्टोबर रोजी विद्यापीठातील दृकश्राव्य सभागृह येथे अमरावती येथील व्याख्याते प्रा. कमलाकर पायस यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. म. सु. पगारे होते.
प्रा. कमलाकर पायस यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, बुद्ध हे कोण होते असा प्रतिप्रश्न करून व्याख्यानास सुरुवात करत हीनयान आणि महायान बुद्ध धर्मातील दोन प्रमुख पंथ असून दोघांचाही मुल आधार तथागत गौतम बुद्धांचे विचार व शिकवण आहे. यामध्ये बुद्ध हे महामानव असून त्यांनी साधनेने ज्ञान प्राप्ती केली असे त्यांनी नमूद केले. बुद्धांच्या काळात बुद्ध धम्म तत्कालीन साधनांच्या माध्यमातून संपूर्ण जगभर पसरला. बुद्धिझम म्हणजेच लोकशाही होय. त्यांनी हीनयान आणि महायान यांच्यातील फरक तसेच या दोन पंथांचे स्वरूप थोडक्यात सांगितले. तसेच बुद्धांचा धम्म हा वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारणारा कर्मकांडाला नकारणारा व समता, बंधुता तसेच बहुजन हिताय बहुजन सुखाय या सूत्राच्या आधारावर सर्व सामान्य माणसाचे कल्याण करणारा आहे.
अध्यक्षीय भाषणात प्रा. म. सु. पगारे यांनी सांगितले की, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी पाच लाख अनुयायी सोबत बौद्ध धम्म स्वीकारला. बौद्ध धम्म स्वीकारण्याचे कारण की, या धम्मात जात, पात, वर्ण व्यवस्था नव्हती. तिथे विज्ञानवाद, बंधुता, समानता आहे. प्रज्ञा, शील, करुणा, पंचशील यांचे आचरण करणे हाच एकमेव शुद्ध मार्ग होय. विषमतेचा नाश म्हणजेच बौद्ध धम्म होय. दोन्ही पंथातील विविधतेनुसार त्यांच्या धार्मिक आचार विचारामध्ये मूर्तीपूजा, ग्रंथ, बौद्धिक साधना व तात्विक विचारामध्ये फरक आढळतो. बुद्ध धम्माचा अंतिम हेतू एकच असून दुःखातून मुक्ती म्हणजेच निब्बाण मिळवणे होय.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बौद्ध अध्ययन व संशोधन केंद्राचे विभागप्रमुख प्रा. संतोष खिराडे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. गौरव हरताळे यांनी तर आभार प्रदर्शन जितेंद्र नाईक यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील भाषा व संशोधन केंद्रातील प्राध्यापक, विद्यापीठातील कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम